शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून विधानसभेसाठी ‘मायक्रो प्लॅनिंग’; शिंदे गटाला जोरदार लढत देणार!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाकडे असलेल्या आमदारकीच्या सर्व जागा काढून घेण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने जोरदार कंबर कसली असून, विधानसभानिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने कडवट शिवसैनिकांकडे विधानसभानिहाय जबाबदार्या सोपविण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक विजया खडसन पाटील यांच्याकडे चिखली, सिंदखेडराजा, मेहकर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जिल्हा महिला संघटिका विजया खडसन पाटील यांच्याकडे चिखली, सिंदखेडराजा, मेहकर या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्हा संघटक गोपाल बछिरे यांच्याकडे बुलढाणा जिल्हा, विधानसभा संघटक विजय (बंडू) बोदडे यांच्याकडे खामगाव विधानसभा, विधानसभा समन्वयक भिपुलाल जैन यांच्याकडे खामगाव विधानसभा, तालुका प्रमुख हर्षल आखरे यांच्याकडे शेगाव तालुका, श्रीराम खेलदार यांच्याकडे खामगाव तालुका तर संदीप वर्मा यांच्याकडे खामगाव शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून अनेकांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. सद्या तरी निष्ठावंतांना प्राधान्य देण्याचे धोरण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेले आहेत. विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणीला व मतदारापर्यंत पोहोचण्याला तूर्त प्राधान्य देण्यात आले असून, उमेदवारीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतःच निर्णय घेणार आहेत.
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर हे स्वतः चिखली किंवा सिंदखेडराजा मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता असून, बुलढाण्यातून लढण्यासाठी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी गावभेट दौरे सुरू केले आहेत. मेहकर, सिंदखेडराजा, बुलढाणा या तीन मतदारसंघांवर शिवसेना (ठाकरे) पक्षाने दावा सांगितलेला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात या जागा त्यांना मिळतात, की त्यांच्या सहयोगी पक्षांना मिळतात, हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
———-