पुणे (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बोर्डाकडून उद्या (दि.२१) दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उद्या आपला निकाल हा पाहू शकतील. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागून आहे. आज राज्य मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली असून, निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. विद्यार्थी उद्या https://mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर त्यांचे निकाल तपासू शकतात. मागीलवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात आला होता, तर दहावीचा निकाल २ जूनला लागला होता. बोर्डाकडून दहावीचा निकाल मेच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल, असे यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले आहे.
काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर महाराष्ट्र बोर्डाने बारावी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. हा निकाल उद्या मंगळवारी २१ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. राज्य मंडळाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी बारावीच्या निकालाबाबतचे सोमवारी पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार मंगळवार २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. हा निकाल पाहिल्यानंतर लगेचच निकालाची प्रिंटही घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यक आहे. यंदाच्या निकालाच कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यंदा निकालाची टक्केवारी वाढणार असल्याचीही चर्चा आहे.
– ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार निकाल –
– mahresult.nic.in
– http://hscresult.mkcl.org
– www.mahahsscboard.in
– https://result.digilocker.gov.in
– http://results.targetpublications.org
– results.gov.in.
यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. राज्यातील १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२५, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता. बोर्डाच्या नियमांनुसार, बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण घोषित होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी आणि तोंडी परीक्षांमध्ये मिळून किमान ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. तसेच गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी २२ मे ते ५ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणार्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना २७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज भरता येईल. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.