लोणार, सिंदखेडराजा, चिखली तालुक्यांत चक्रीवादळ, पावसाचा तडाखा!
– वीज गायब झाल्याने ‘महावितरण’चा गलथान कारभार चव्हाट्यावर; लोणार तालुक्यात मात्र वीजपुरवठा युद्धपातळीवर पूर्ववत!
बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, व चिखली तालुक्यांतील काही गावांना अवकाळी पाऊस, व चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. रविवार आणि आज, सोमवारीदेखील अनेक गावांतील वीज गायब असल्याने महावितरणच्या गलथान कारभाराबद्दल ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पाऊस व वादळामुळे कांदा व भुईमूग उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, वातावरणामुळे उत्पन्नावर परिणाम झाला असून, काढणीस अडचणी येत आहेत.
काल, रविवारी पाच वाजेच्या सुमारास बिबी व लोणार तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वार्यासह पाऊस झाला. या वादळी वार्यामुळे बिबी, किनगावजट्टू, देवानगर, खंडाळा, वझर आघावसह अनेक गावांत घरांवरील टिनपत्रे तसेच देवानगर येथील जिल्हा परिषद शाळेवरील संपूर्ण टिनपत्रे उडून गेलीत. अनेक ठिकाणी महावितरणचे खांब उन्मळून पडले होते. तरीदेखील वीज पुरवठा सुरूळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करताना दिसून आलेत. बिबी केंद्रातील सहाय्यक अभियंता संतोष राजपूत, संजय खारडे, विनायक कराड, रवी शेजूळ, कोमल राठोड, रामेश्वर मुंडे आदी कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेऊन अवघ्या दोन तासांमध्ये वीज पुरवठा सुरूळीत केला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. वादळ एवढे भयंकर होते, की अर्धा तास काहीच समजत नव्हते, की नेमके नुकसान किती करुन गेले. तथापि, लोणार तालुक्यात जीवितहानीचे अद्याप तरी वृत्त हाती आलेले नाही. मौजे बिबी येथे या वादळामुळे वैभव गजानन आंधळे यांच्या शेतातील गट नंबर ११ मधील ५० वर्ष जुने मोठे आंब्याचे झाड कोसळले असून, आंधळे यांचे अंदाजे ३० हजार रूपयांचे नुकसान झालेले आहे. या आंब्याचा आंबा अतिशय चांगल्या दर्जाचा होता, त्यामुळे या शेतकर्याचे मोठे नुकसान या वादळाने केलेले आहे.
या शिवाय, सिंदखेडराजा, देऊळगावराजा व चिखली तालुक्यांतील काही गावांतदेखील जोरदार वादळाचा मोठा फटका बसला आहे. वीजेचे खांब पडल्याने वीज गायब झाली होती. आज दुपारपर्यंतदेखील अनेक गावांत वीज पुरवठा सुरूळीत झाला नव्हता. शेळगाव आटोळ येथील वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने परिसरातील गावे अंधारात होती.