Breaking newsHead linesMumbaiPolitical NewsPoliticsWorld update
महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी उद्या मतदान
– मुंबईत कडेकोट बंदोबस्त; उद्धव ठाकरेंसाठी महाआघाडी एकवटली!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार शनिवारी सायंकाळी थांबल्यानंतर आज दिवसभर उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी व सोशल मीडियावरील प्रचाराचा जोर लावला होता. उद्या (दि.२०) मुंबईतील सहा जागांसह राज्यातील १३ जागांकरिता मतदान होणार असून, उत्तरप्रदेशातील अमेठी, रायबरेली, लखनऊसह महत्वाच्या लढतींसाठीही उद्याच मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा उद्या शेवटचा टप्पा आहे. या शेवटच्या टप्प्यात मुंबईत ठाकरे बंधू आमने-सामने आलेत. प्रचार थांबण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंवर चांगलेच तुटून पडले होते. कारण, शेवटच्या टप्प्यातील मतदान हे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात होत आहे. मुंबईतील सहा जागांवर महाआघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर आहे. महाराष्ट्रासह बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, झारखंड, लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांतदेखील उद्या मतदान आहे. ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी या मतदारसंघात चुरशीच्या लढती आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडण्यासाठी ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांमध्ये १५ हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
मुंबईतील काही सिलिब्रिटी व बड्या हस्तींकडून नागरिकांना मतदानाचं आवाहन करण्यात येत आहे. उद्योगपती रतन टाटा यांनीही मुंबईकरांसाठी विशेष ट्विट केलंय. सोमवार हा मतदानाचा दिवस आहे, मुंबईकरांनो घराबाहेर पडून मतदानाचा हक्क आणि जबाबदारी निभावा, असे आवाहन टाटा यांनी केलं आहे. रतन टाटा यांच्या ट्विटला 45 हजार लाईक्स मिळाले असून 9 लाख 23 हजार जणांनी हे ट्विट पाहिल्यांचं दिसून येतेय. तर, 4.9 हजार युजर्संने हे ट्विट रिट्विट केलंय. तर, बातमी लिहीपर्यंत 994 कमेंट त्यांच्या ट्विटवर पडल्या आहेत.