गुंजच्या पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले; आता भीषण पाणीटंचाईत विहिर अधिग्रहणाचा आधार!
– गुंज सरपंचांच्या पत्रालाही ‘झेडपी’च्या पाणी पुरवठा अधिकार्यांकडून केराची टोपली!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथून जवळच असलेल्या गुंज येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम चार वर्षांपासून रखडत पडले असून, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे ही योजना कागदोपत्री पूर्ण करुन मलिदा लाटण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? अशी शंका सरपंचांनी व्यक्त केली आहे.
गुंज येथील पूर्वीची पाणीपुरवठा योजना अपुरी पडत असल्याने चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली होती. या कामाचे कंत्राट नंदकिशोर बाहेकर यांनी घेतल्याचे समजते. त्यांनी जलकुंभाचे काम अर्धवट करुन पाईपलाईन काही भागात टाकून काम तसेच बाकी ठेवले. या जलकुंभात आजपर्यंत पाण्याचा एकही थेंब आला नाही. मागील वर्षी पाऊस हा कमी प्रमाणात झाल्याने परिसरातील जलस्रोत झपाट्याने आटले आहे. पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरपंच सुरेश तुपकर यांनी पाणीपुरवठा योजनेच्या अधिकार्यांना पत्र लिहून अवगत केले होते. परंतु, संबंधित अधिकार्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. जलकुंभाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. विहिरीचे कामही पूर्ण केले नाही. त्यामुळे केवळ कागदी घोडे नाचवून काम पूर्ण झाल्याचा देखावा हे अधिकारी करु शकतात, असा संशय सरपंच यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करून कामात दिरंगाई करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गुंज आणि सावंगी भगत ही गट ग्रामपंचायत असून, सावंगी भगत या ४०० लोकसंख्या असलेल्या गावाला साखरखेर्डा येथील महालक्ष्मी तलावाच्या काठावर विहिरचे खोलीकरण करण्यात आले आहे. परंतु, बांधणीसाठी आवश्यक मार्गदर्शन ठेकेदार शिवाजी काटे यांनी मागितले असता, एकही अभियंता काम पाहणी करण्यासाठी आला नाही. तेही काम रखडत पडले असून, येथे पाणीपुरवठा करण्यासाठी विहिर अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अपूर्ण कामाबाबत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता चंद्रकांत नागरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
गेल्या चार वर्षांपासून गुंज येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम सुरु आहे. मागील दोन वर्षांत काहीही काम झाले नाही. याबाबत पाणीपुरवठा योजनेच्या अधिकार्यांना पत्र लिहून काम पूर्ण करण्यासाठी मागणी केली होती. परंतु, त्या पत्राची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
– सुरेश माधवराव तुपकर, सरपंच, गुंज