शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!
नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – दारूडा मुलगा शेती नावावर करून देण्यासाठी वडिलांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करत असताना, वडिलांनी शेजारी पडलेली लाकडी फळी उचलून त्याच्या डोक्यात घातली. हा घाव वर्मी लागल्याने या दारूड्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे घडली. शिवाजी दादासाहेब जाधव, असे मृत मुलाचे नाव असून, दादा सारंगधर जाधव असे आरोपी वडिलांचे नाव आहे. अलकाबाई दादासाहेब जाधव या मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक केली आहे.
सविस्तर असे, की नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील शिवाजी जाधव व वडील दादासाहेब जाधव यांच्यामध्ये शेतीवाटपाच्या कारणावरून मंगळवारी जोरदार भांडण झाले. यात शिवाजीने वडील दादा सारंगधर जाधव यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे मुलगा शिवाजीच्या डोक्यावर दादा जाधव यांनी फळी मारली असता, तो जागीच कोसळला. दि.१४ मेरोजी ५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शिवाजी दादासाहेब जाधव याचा खून झाल्यानंतर मयताची आई अलका दादासाहेब जाधव हिच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस ताब्यात घेतलेले आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे तपास करीत आहेत.
अलका जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि.१४ मेरोजी दु. ०५/३० वा. चे सुमारास गोधेगाव ता. नेवासा येथील माझे रहाते घराचे समोरील पत्र्याचे शेडमध्ये मुलगा शिवाजी दादा जाधव वय ३६ वर्षे हा दारु पिवून येऊन आम्हांला वाईट शिवीगाळ करुन माझे पती यांना तुमच्या नावावर राहिलेली एक एकर शेतजमीन माझे नावावर करुन द्या. तुम्ही येथे राहू नका. तुमचे जनावरे येथे बांधू नका, नाहीतर तुम्हाला जीवे ठार मारुन टाकीन, अशी धमकी देवून पती दादासाहेब यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण करु लागला असता, पती दादासाहेब यांनी त्यास प्रतिकार करत, पत्र्याचे शेडजवळ पडलेली लाकडी फळी त्याच्या डोक्यात जोरात मारुन गंभीर दुखापत केल्याने तो मयत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास नेवासा पोलिस करत आहेत.
————–