बांधकाम विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून ‘भारती एअरटेल’ने रस्ता उखडला, झाडांचीही कत्तल!
– एअरटेल कंपनी व संबंधित ठेकेदारीची मुजोरी; जेसीबीने रस्ता खोदून मलबा जागेवरच टाकला; अपघाताची शक्यता!
– कंपनीचा ठेकेदार खुलेआम रस्ते उखडून नुकसान करत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी मूग गिळून बसले, फोनही घेईनात!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – गोरेगाव ते साखरखेर्डा या मुख्य रस्त्याला समांतर जमिनीअंतर्गत केबल टाकण्यासाठी परवानगी देतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या शर्ती व अटी धाब्यावर बसवून भारती एअरटेल कंपनीच्यावतीने केबल टाकण्यासाठी नियमबाह्य खोदकाम सुरूच असल्यामुळे कंपनीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. या धक्कादायक प्रकाराकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सोयीस्करपणे डोळेझाक होत असल्यामुळे शासनाने संबंधित केबल कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार्यांविरुद्ध कारवाई करून सदर बाबींची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांच्यावतीने केली जात आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी व रस्त्याचे सौंदर्यात भर घालण्यासाठी रस्त्याच्या बाजूला सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने वृक्षलागवड केली होती. वाढविलेल्या शेकडो झाडांची हे खोदकाम करतांना अमाणूसपणे तोडदेखील झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व एअरटेल कंपनी या दोघांचेही खालचे सोडून वर गुंडाळण्याचा असाच प्रकार दिसून येत आहे.
लव्हाळा ते मलकापूर -पांग्रा या राज्य मार्ग क्र. २२२ या किमी.११८.०० ते किमी. १४४.०० आरएचएस. २६००० मीटर लांबीमध्ये मागील अनेक दिवसांपासून रस्त्याचे कडेला मार्गालगत मुख्य डांबरी रस्त्याला लागूनच समांतर में.भारती एअरटेल कंपनीचे ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू केले आहे. सध्या साखरखेर्डा – गोरेगाव मार्गावर हे विनापरवानगी, नियम व अटी डावलून नाली खोदण्याचे काम सुरू असून, या नालीतील मुरूम व दगड डांबरी रस्त्यावर टाकला जात आहे. वाहतूकदारांना मोठा अडथळा निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे हद्दीत येत असून, चांगल्या रस्त्याची दुरवस्था होत असतांनाच सार्वजनिक बांधकाम विभाग मूग गिळून गप्प बसले आहे. याबाबत यापूर्वीही अनेक नागरिकांनी वृत्तपत्रातून तथा माध्यमातून ओरड होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग व एअरटेल कंपनी दोघेही ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशा अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, भारती एअरटेल कंपनीने भूगर्भातून ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागितलेल्या परवानगीनुसार कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा यांचे पत्र क्र.८८६३/साबांबु/चिशा/ओएफसी/२०२३ / दि.२९ फेब्रुवारी २०२३ च्या कंपनीला दिलेल्या पत्रानुसार, लव्हाळा ते मलकापूर -पांग्रा या किमी.११८ ते किमी. १४४ दरम्यान २६००० मीटर बाबींमध्ये रस्त्याच्या बाजूने मध्यापासून १५ मीटर अंतराच्या पुढे किंवा हद्द सोडून जे जास्त असेल त्याठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागापासून १.६५ मीटर खोदकाम करून भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी परवानगी दिली आहे, आणि नियमानुसार काम होते की नाही याची संयुक्त तपासणी करण्याबाबत संदर्भित पत्र क्र.४ अन्वये उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा अहवाल मागविण्यात आला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा यांचे उपरोक्त निर्देशानुसार कंपनीचे खोदकाम होत नसून, अटी व नियम डावलून सर्रास नियमबाह्य खोदकाम करून चांगल्या रस्त्याची वाट लावली जात आहे. शिवाय, वाहतुकीस अडथळा निर्माण करून अपघातास निमंत्रण देणारा प्रकार घडत आहे. कंपनीच्या या अवैधरित्या होत असलेल्या खोदकामाबाबत अनेक तक्रारी व माध्यमातून चोहोबाजूंनी ओरड झाल्यानंतर बी.एन्.काबरे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, देऊळगावराजा यांच्या पत्र क्र.३५/ता./२०२२ दिनांक १० जानेवारी २०२४ यांनी कंपनीचे संदीप गायकवाड, मालेगाव, नाशिक यांना दिलेल्या पत्रानुसार गोरेगाव ते साखरखेर्डा दरम्यान डांबर कडेला लागून जेसीबीव्दारे विना परवानगी खोदकाम करीत असून, त्यातील मुरूम, माती डांबरी रस्त्यावर टाकल्यामुळे रस्त्याच्या कडेला पट्ट्या पूर्णपणे खराब होत आहेत. तरी हे रस्त्याच्या साईड पट्यावरील डांबरी कडेला लागून करीत असलेले विनापरवानगी-खोदकाम त्वरित बंद करावे, अन्यथा आपल्याविरूद्ध पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशारा पत्र दिले होते. या पत्राची एक प्रत माहिती करिता येथील पोलिस स्टेशनलासुध्दा दिली होती. तरीही सदर कंपनी सरळ वर्दळ असलेल्या डांबरी रस्त्याला लागूनच नाली खोदकाम करून नालीतील मुरूम व नालीतील मटेरिअल सरळ डांबरी रस्त्यावर टाकल्यामुळे रस्त्याची रूंदी सुमारे ५ फुटाने कमी झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बालाजी काबरे व कनिष्ठ अभियंता आढाव यांच्याशी दूरध्वनीवरून अनेकवेळा संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांचे या कंपनीशी व संबंधित ठेकेदाराशी काय साटेलोटे आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांचे कार्यालयातून फक्त माहिती करिता सादर असे पत्र आले आहे. पण अवैध खोदकाम करणार्याविरूद्ध कारवाई करण्याबाबत कोणतेही पत्र अजूनही आलेले नाही. बांधकाम विभागाच्यावतीने तसे पत्र आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
-स्वप्निल नाईक, ठाणेदार, पोलिस स्टेशन, साखरखेर्डा.
———