सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील अवैध रेती वाहतूक जोरात सुरू असताना उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज फिरते पथकाने तालुक्यातील देवखेड येथे अवैध रेती वाहतूक करताना एक ट्रॅक्टर पकडून किनगावराजा पोलिस स्टेशनला जमा केला आहे. या पथकाने धाड घालून ही कारवाई केली. महसूल विभागाच्या धडक कारवाईने रेतीचोरांचे चांगलेच धाबे दणाणलेले आहेत.
सविस्तर असे, की सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथून अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती १७ मेरोजी गुप्त बातमीदारामार्फत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना मिळाली होती. या माहितीवरून उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे तसेच तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज फिरते पथकाने देवखेड येथे धाड मारली असता, रात्री १ वाजता एक विना नंबरचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर विनोद नामदेव आढाव यांच्या मालकीचा अवैध रेती वाहतूक करताना पकडले गेले. यावेळी सदर चालकाकडे रेती वाहतूक परवाना नसल्याने सदर वाहन किनगाव राजा पोलिस स्टेशनला अटकाव करण्यात आले आहे. सदर कारवाई बी.जी.साळवे तलाठी, जी.एस. टेकाळे तलाठी, विष्णू थोरात तलाठी, एस ई शिंगणे तलाठी, एल बी राजपूत तलाठी यांनी केली आहे.