– पंचनामे होऊन तातडीने दुरूस्ती व्हावी – शेतकरी नेते विनायक सरनाईक यांची मागणी
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील अनेक गावात कालच्या अवकाळी पावसाने हाहाकार उडविला. सोमठाणा येथील शाळेवरील पत्रे उडाली, तर अनेक गावांतील ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडाली असून, घराच्या भिंतीही कोसळल्या. अन्वी येथील स्मशानभूमीची टीनपत्रेही यापूर्वी उडालेली आहेत. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे. शेळगाव आटोळ परिसर, भरोसा, सोमठाणा आदी भागात या पावसाने दाणादाण उडवली असून, शेळगाव आटोळ येथील विद्युत उपकेंद्रातील बिघाडामुळे या केंद्राच्या परिसरातील गावांत वीजेचा खेळखंडोबादेखील झालेला होता.
कालच्या पावसामुळे व वादळामुळे सोमठाणा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील पत्रे उडून गेली असून, भरोसासह इतर गावांतही बरेच नुकसान झालेले आहे. काढणीला आलेला कांदा, भुईमूग यांनाही तडाखा बसला आहे. जोरदार वार्यासह अवकाळी पावसामुळे गोठे, घरे यांच्या भिंती पडल्या असून, झाडे कोसळून मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीची पाहणी आज शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी करून पीडित ग्रामस्थांना दिलासा दिला, तसेच तहसील प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही सरनाईक यांनी केली आहे.
यापूर्वी दोन आठवड्यापूर्वी तालुक्यात झालेला वादळी वारे, पाऊस व काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने सोमठाणा इतर काही गावामधील शाळेचे टिनपत्रे उडणे, भिंत कोसळणे त्याचप्रमाणे काही यापूर्वी अन्वी गावांमधील स्मशानभूमीचे टिनपत्रे उडल्याने मोठे नुकसान झाले आहे. तातडीने अशा घटनांचे पंचनामे होवून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
- विनायक सरनाईक, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, बुलढाणा
शेळगाव आटोळ येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचा विद्युत पुरवठा काल दुपारी एक वाजेपासून खंडित झाला होता. तो सुरूळीत करण्यास महावितरणच्या कर्मचार्यांना बराच वेळ लागल्याने परिसरातील गावांतील ग्रामस्थ संतप्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी याप्रश्नी महावितरणच्या अधिकार्यांना धारेवर धरल्यानंतर तातडीने बिघाड दुरूस्त करून वीज पुरवठा सुरूळीत करण्यात आला होता.
——–