– सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा; मुंबई, लातूरची उत्तीर्णची टक्केवारी घसरली!
पुणे (विशेष प्रतिनिधी) – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. राज्यात बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आली होती. यंदा राज्यात बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वाधिक निकाल कोकण ९७.९१ तर सर्वात कमी मुंबई ९१.९५ निकाल लागला आहे. पत्रकार परिषदेला राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर यावेळी उपस्थित होते. गतवर्षीच्या तुलनेत यावेळी २.१२ टक्के विद्यार्थी जास्त उत्तीर्ण झालेत. आता विद्यार्थ्यांना ५ जूनपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९१.६० अशी आहे. तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९५.४४ अशी आहे.
शरद गोसावी म्हणाले, की यंदा गैरप्रकार घटले असून प्राथमिक शिक्षण विभाग माध्यमातून २७१ भरारी पथके कार्यरत होती. तसेच जिल्हा स्तरावर देखील भरारी पथके तैनात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्यास कोणत्या शिक्षा होऊ शकते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाईन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत झाली आहे. राज्यात नियमित, दीव्यांग, पुनपरीक्षा, असे एकूण १५ लाख २० हजार १८१ विद्यार्थी यांनी नोदणी केली. त्यापैकी १५ लाख नऊ हजार ८४८ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी १३ लाख ८७ हजार १२५ विद्यार्थी पास झाले आहे. यंदा नियमित विद्यार्थी १४ लाख ३३ हजार ३७१ विद्यार्थी यांनी परीक्षा नोंदणी केली, त्यापैकी १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थी यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे यंदा नियमित विद्यार्थी परीक्षा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. या परीक्षेत दिव्याग विद्यार्थी निकाल ९४.२० टक्के आहे. एकूण निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींचा निकाल ९५.४४ टक्के तर मुलांचा निकाल ९१.६० टक्के निकाल आहे.
विभागनिहाय निकाल
– पुणे – ९४.४४ टक्के
– नागपूर – ९२.१२ टक्के
– छत्रपती संभाजीनगर -९४.०८ टक्के
– मुंबई – ९१.९५ टक्के
– कोल्हापूर – ९४.२४ टक्के
– अमरावती – ९३ टक्के
– नाशिक – ९४.७१ टक्के
– लातूर – ९२.३६ टक्के
– कोकण -९७.५१ टक्के
बारावी परीक्षेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाला आहे. मात्र बोर्डाने दिलेली mahresult.nic.in ही वेबसाईट पहिल्या मिनिटापासून डाऊन झाली. विद्यार्थी आणि पालकांनी बारावीचा निकाल पाहण्यासाठी या वेबसाईटवर अक्षरश: उड्या घेतल्या. मात्र ही वेबसाईटच ओपन होत नसल्याचं पाहायला मिळाले. यानंतर पाच मिनिटांनी ही वेबसाईट पुन्हा सुरु झाली. बारावीची सहा माध्यमांतील १५४ विषयांची परीक्षा घेण्यात आली. अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाइन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत झाली. गैरप्रकारांची संख्या घटली. राज्यस्तरावर २७१ भरारी पथके नेमण्यात आली होती, तसेच जिल्हा स्तरावरही स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती.
————