‘ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज मीडिया’च्या ‘संपादकीय संचालक’पदी शिवश्री प्रवीण मिसाळ यांची नियुक्ती
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ विचारधारेचे प्रसिद्ध शिवव्याख्याते व मराठा सेवा संघाच्या मुशीत तयार झालेले अभ्यासक, विद्यार्थिप्रिय मुख्याध्यापक शिवश्री प्रवीण सुधाकर मिसाळ यांची ‘ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज मीडिया’च्यावतीने ‘मानद संपादकीय संचालक’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. व्यवस्थापनाला ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ विचारधारेनुसार प्रसारमाध्यम धोरणनिश्चितीसाठी ते सहाय्य करणार असून, तब्बल १५ लाख वाचक संख्या असलेले ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ हे पुरोगामी वाचकांभिमुख करण्यासाठी ते आपले महत्वपूर्ण योगदान देणार आहेत.
पत्रकारिता, शिक्षण, राजकारण, प्रशासन, सिनेमा, समाजकारण या सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणार्या मान्यवरांचे गाव म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मिसाळवाडी या गावाचे भूमिपुत्र असलेले शिवश्री प्रवीण मिसाळ हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थिप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांची ओळख असून, मराठा सेवा संघाच्या विचारधारेत आणि मुशीत त्यांचे अभ्यासू नेतृत्व तयार झालेले आहे. प्रसिद्ध शिवव्याख्याते असलेले प्रवीण मिसाळ हे स्वराज्य शिक्षक संघाचे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच, ते मुख्याध्यापक संघाचे देऊळगावराजा (जि. बुलढाणा) तालुका अध्यक्ष म्हणूनदेखील गत दोन वर्षांपासून सक्रीय आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाचा खर्च उचलून त्यांनी अनेक मुला-मुलींचे शैक्षणिक भवितव्य घडवलेले आहे.
सिद्धिविनायक वेबटॉकिज डिजिटल मीडिया प्रा. लि. नवी दिल्ली/ पुणे या कंपनीसोबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज मीडिया’चा व्यावसायिक भागिदारी करार झाला असून, या करारानुसार पुढील १० वर्षात वेबटॉकिज मीडिया तब्बल १० कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्याअंतर्गत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ विविध प्रादेशिक भाषांत विस्तारीत होणार असून, उपग्रहीय वाहिनीच्या स्थापनेसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. सद्या मुंबई, पुणे व सोलापूर येथून प्रसारित होणारे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ हे राज्यातील आघाडीचे न्यूज मीडिया असून, तब्बल १५ लाख मराठी भाषिक जनता वाचक आहे.