Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

बुलढाण्यात येऊन अजितदादा, फडणवीसांनी आ.संजय गायकवाडांना सुनावले खडेबोल!

- शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा : उपमुख्यमंत्री अजित पवार - महापुरूषांचे पुतळे बसवले, विचारही आचरणात आणा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– लाडक्या बहिणींचा सन्मान व संत, महापुरूषांच्या पुतळ्यांचे लोकार्पण

बुलढाणा (बाळू वानखेडे) – बोलत असताना वाणीवर नियंत्रण असले पाहिजे, आपल्या बोलण्यामुळे आपल्यासह इतरांचीदेखील अडचण होणार नाही, याबाबत दक्षता बाळगणे गरजेचे आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले तर महापुरुषांचे पुतळे हे भावी पिढीला दिशादर्शकच ठरत असतात, त्यामुळे ते बसवलेच पाहिजेत. परंतु त्यांचे विचार आचरणात आणणेदेखील गरजेचे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अजितदादा व फडणवीस यांचे हे उद्गार म्हणजे बुलढाण्यात येऊन आमदार संजय गायकवाड यांना दिलेल्या जोरदार कानपिचक्या मानल्या जात आहेत. आता तरी आ. गायकवाड बोलताना जीभेवर नियंत्रण ठेवतील की नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठच्या आवारात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांचा सन्मान, तसेच महापुरूष व संतांच्या पुतळ्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते गुरूवारी (दि.१९) पार पडले. यावेळी उपरोक्त दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून आ. संजय गायकवाड यांना खडेबोल सुनावल्याचे दिसून आले. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे तसे वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ कापून आणणारास ११ लाखाचे बक्षीस आ.गायकवाड यांनी जाहीर करून नव्या वादाला तोंड फोडले. यापूर्वी त्यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे विषाणू कोंबण्याबाबतचेदेखील वक्तव्य केले होते. अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे आ.संजय गायकवाड चांगलेच चर्चेत राहात असले तरी, त्यांच्यामुळे बुलढाण्याचे नाव राज्य व देश पातळीवर खराब झालेले आहे. आतादेखील त्यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा काँग्रेसच्यावतीने ठीकठिकाणी निषेधही करण्यात येत आहे. बुलढाण्यात तर त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल झाले असून, यासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले. दरम्यान, दि.१९ सप्टेंबररोजी बुलढाणा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा सन्मान व महापुरूष व संतांच्या पुतळ्याचे लोकार्पण मोठ्या थाटामाटात व प्रचंड गर्दीच्या साक्षीने पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलत असताना तोलून मापून बोलले पाहिजे, आपल्या बोलण्यामुळे आपल्यासह इतरांनाही त्रास होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, अशा शब्दांत आ. गायकवाड यांचा नामोल्लेख टाळून खडेबोल सुनावले. दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणा दरम्यान बुलढाण्यात मोठ्या संख्येने महापुरुषांचे व संतांचे पुतळे बसवल्याबद्दल आ.संजय गायकवाड यांचे कौतुक केले, पण नुसते पुतळे बसवून चालणार नाही तर महापुरुषांचे विचारदेखील आचरणात आणले पाहिजेत, असे सांगत त्यांनीही आ.संजय गायकवाड यांना अप्रत्यक्षपणे खडेबोल सुनावले. वरिष्ठांनी सुनावल्यानंतर आतातरी आ. गायखवाड आपल्या जीभेला लगाम घालतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!