Head linesSINDKHEDRAJA

रेतीतस्करीचा दीड महिन्यांपूर्वीचा गुन्हा; आरोपी निष्पन्न होऊनही मोकाटच!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – अवैध रेती तस्करीप्रकरणी जमावावर गुन्हा दाखल होतो. त्यानंतर रेती तस्करी रोखण्यासाठी रस्ते खोदून बंद करण्यात येतात. जमावातील निष्पन्न झालेल्या त्या आरोपींवर कारवाई करा, म्हणून महसूल उपविभागीय अधिकारी निर्देश देतात. मात्र तरीही पोलिस यंत्रणा ढिम्मच असल्याचे अफलातून चित्र तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
वाळूतस्करीची दाहकता

तालुक्यातील निमगाव वायाळ येथे २६ मार्च रोजी खडकपूर्णा नदी पात्रातून ४० ते ४५ मजूर अवैध रेती उत्खनन करुन चार ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याची खबर महसूल यंत्रणेला मिळाली. त्यावर कारवाई करण्यासाठी प्रतिबंधक टीम तेथे पोहोचली. मात्र टीम पोहोचल्यावर त्यांनी व्हिडिओ चित्रण केले. हे चालू असतांनाच रेती भरणारे मजूर व ड्रायव्हर तेथून पळून गेले. त्यानंतर हातात खोदण्या, भरण्याची हत्यारे घेऊन मजूर व ड्रायव्हर परतले. त्यातील तीन ड्रायव्हरांनी पथकातील यशवंत घरजाळे व विष्णू थोरात यांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न करीत, तेथून पळून गेले. चौथे ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न करीत असतांनाच निमगाव ग्रामस्थ व तत्कालीन तहसीलदार सचिन शंकरलाल जैस्वाल हे तेथे पोहोचल्याने तो प्रयत्न फसला. या प्रकरणी तहसीलदार जैस्वाल यांच्या फिर्यादीवरुन अप. नं. ७२/२०२४ कलम ३५३, ३७९, ५०६, १४३, १४७, १४९ भादंवि सहकलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७), ४८ (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास रमेश गोरे यांच्याकडे सोपवण्यात येतो. एवढे सगळे गंभीर प्रकार झाल्यावर रेती माफियांवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी अपेक्षा होती. दरम्यान, निमगाव वायाळ प्रकरणात विविध माध्यमांतून आरोपींची ओळख पटली जावून सुद्धा त्यांच्यावर अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही. या बाबतीत एसडीओ संजय खडसे यांनी ठाणेदारांना वेळोवेळी निर्देश देऊनही काहीच उपयोग झाला नसल्याचेच चित्र आहे.


महसूल व पोलीस दोन्हीही विभाग महाराष्ट्र शासनाचे अविभाज्य अंग असतांनाही, कुणाच्या भरवश्यावर आरोपींना कारवाई केल्या न जाता, उलट खुलेआमपणाने रेती तस्करीची मुभा मिळते? जमावाची रेती तस्करी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे, वरिष्ठ निर्देश देत असतांनाही तस्करी पूर्ववत जोमात सुरु असणे, यातून महसूल व पोलीस विभागांचा बेबनाव समोर येतो. हा बेबनाव वाट्याहिस्स्यातून होतोय, की आणखी काही कारणाने होत आहे? याची वरिष्ठ यंत्रणेने गांभीर्याने दखल घेऊन रेतीतस्करीवर प्रतिबंध घालण्यासाठी वेळीच दखल घेणे गरजेचे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!