बुलढाण्यात हुकूमशाही?; माजी आ. राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळांसह काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात!
- मुख्यमंत्र्यांच्या दौर्यानिमित्त पोलिसांची कारवाई! शेतकर्यांनी रक्ताने लिहिलेले निवेदन नाकारले; सर्व स्तरातून तीव्र संतापाची लाट
काँग्रेसने दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे!
कांग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापासून रोखले; महिला पोलिस आणि जयश्रीताई शेळके यांच्यात झटापट!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या ८ नेत्यांना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, बुलढाण्यात लोकशाही नव्हे तर हुकूमशाही सुरू असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्याच्या पृष्ठभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईने जनमाणसातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील काँग्रेसचे आंदोलन मोडित काढण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी अटोकाट प्रयत्न केले. तरीदेखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवलेच. शेतकर्यांनी रक्ताने लिहिलेले निवेदन पोलिसांशी झटापटीत फाटल्यानंतर राहुल बोंद्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या हुकूमशाहीचा अंत जवळ आला आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारला ठणकावले. पोलिसांनी सकाळी हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यात घेतल्यानंतर, काँग्रेस नेत्या अॅड. जयश्रीताई शेळके, राहुल बोंद्रे, संजय राठोड, गणेसिंह राजपूत, अनिकेत मापारी यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते बुलढाणा येथील विविध विकासकामांचे तसेच महापुरूष व संतांच्या पुतळ्यांचे लोकार्पण होणार आहे. तसेच, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा सन्मानदेखील होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरात आले आहेत, सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हेदेखील आले आहेत. या कार्यक्रमाच्या पृष्ठभूमीवर बुलढाण्यात पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त तैनात केला असून, बुलढाणा शहराला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. कार्यक्रमात काही राडा होऊ नये, म्हणून पोलिस डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ हासडणार्यास बक्षीस जाहीर केल्यानंतर आ. गायकवाड व काँग्रेस नेत्यांत तीव्र वाकयुद्ध सुरू झालेले आहे. तर शेतकरीप्रश्नी मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकर्यांच्या रक्ताने निवेदन देण्यात येणार असल्याचे काँग्रेसने कालच जाहीर केले होते. परंतु, त्यासाठी अद्याप पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना अद्याप परवानगी दिलेली नव्हती. काँग्रेसचे नेते लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घेत असताना, बुलढाणा पोलिसांनी आपल्या हुकूमशाही वृत्तीचे दर्शन घडविल्याची लोकचर्चा असून, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या ८ नेत्यांना ताब्यात घेतले आहे. त्याबद्दल सर्वस्तरातून तीव्र टीकेची झोड उठलेली आहे.
आम्हाला केवळ मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे होते. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत, आम्ही त्यांना भेटायचे नाही तर कुणाला भेटायचे? आम्ही सोयाबीन कापसाला भाव मागत होतो, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती मागत होतो. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आम्ही प्रशासनाला वेळदेखील मागितली होती, मात्र आम्हाला वेळदेखील देण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार होतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पुढे केले. रक्ताने लिहिलेले निवेदन फाडले.. मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल, आगामी विधानसभा निवडणुकीत हुकूमशाहीचा अंत होणार म्हणजे होणारच असे राहुल बोंद्रे म्हणाले.
पोलिसांशी झटापट! राहुल बोंद्रे यांच्यासह शेतकरीही पोलिसांच्या ताब्यात!
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी जयस्तंभ चौक येथे आंदोलन केले. पीकविमा, पीक नुकसान भरपाई व इतर शेतकरीहिताच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ मागितली होती. परंतु, प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाही. परिणामी, त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गर्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना त्यांच्या समर्थकांसह काही शेतकर्यांनादेखील ताब्यात घेतले होते.
राज्यात, गल्लीत सगळीकडे हुकूमशाही सुरू आहे. लोकशाहीला पायदळी तुडविले जात आहे. हुकूमशाहीचा आता तर अतिरेक झालेला आहे.
– हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार तथा काँग्रेस नेते—–