आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषदेची जागा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक विकसित करण्यासाठी राखीव असून, सदरची जागा संरक्षित करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या संपूर्ण जागेस कंपाऊंड करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे सचिव सूर्यकांत खुडे यांनी केली आहे.
या संदर्भात खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन च्यावतीने निवेदन देवून लक्ष वेधण्यात आले असल्याचे फाऊंडेशनचे खजिनदार सुरेश नाना झोंबडे यांनी सांगितले आहे. आळंदी नगरपरिषद हद्दीतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक नियोजित जागेच्या संरक्षणासाठी तात्काळ आरक्षित संपूर्ण जागेस संरक्षक कंपाऊंड विकसित करून जागेचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर्षीची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मागील वर्षी प्रमाणे नगरपरिषद हद्दीतील स.नं.१२५/७ ब नगरपरिषद जागेत विकसित होणा-या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नियोजित स्मारक जागेत साजरी करण्यात येणार असल्याचे खुडे यांनी सांगितले. यामुळे या जागेची साफ सफाई करून स्वच्छता करण्यात यावी. मोकळ्या जागेत राडा रोडा, कचरा, टपऱ्या, इतर साहित्य पडलेले आहे. ते तात्काळ काढून घेऊन जागा वापरा योग्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.
येत्या १ ऑगस्ट २०२२ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आळंदीत या नियोजित स्मारकाच्या जागेत साजरी होणार असल्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक जागेस कंपाऊंड विकसित करून इतर आवश्यक कामे तात्काळ हाती घेण्यात यावीत, अशी मागणी अध्यक्ष नानासाहेब साठे यांनी केली आहे.
Leave a Reply