– थरकाप उडवणारी घटना; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी व्यक्त केला शाेक
– राज्य सरकारकडून 10 लाख तर पंतप्रधान कार्यालयाकडून 2 लाखाची तातडीची मदत जाहीर
हेल्पलाईन क्रमांक : घटनास्थळी मदतीसाठी 09555899091
इंदूर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – इंदूरहून अमळनेरकडे येणारी एसटी बस मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात, खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक खालगट पुलाचे कठडे तोडून तब्बल १०० फूट उंचीवरून नर्मदा नदीत कोसळली. या भीषण अपघातात १३ प्रवासी ठार झाले असून, त्यात चार महिलांसह एका लहान बाळाचा समावेश आहे. बसमध्ये ३० प्रवासी असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु, कुणीही जीवंत बाहेर येऊ शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्य परिवहन महामंडळाने तातडीने १० लाख तर पंतप्रधान कार्यालयाने दोन लाखाची मदत जाहीर केली आहे. बसचे टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.
हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ (आग्रा-मुंबई महामार्ग)वर धार आणि खारगोने जिल्ह्यांच्या सीमेवर झाला. सकाळी ९.३०च्या दरम्यान बसमधील तांत्रिक चुकीमुळे ही बस पुलाचे कठडे तोडून नर्मदा नदीत कोसळली. अपघातस्थळ हे जळगावपासून २३० किलोमीटरवर आहे. हे वृत्तलिहिपर्यंत १३ मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले होते. त्यापैकी ८ जणांची ओळख पटली होती. बसचे चालक चंद्रकांत एकनाथ पाटील व वाहक प्रकाश श्रावण चौधरी हेदेखील मृत्युमुखी पडले आहेत. हे दोघेही अमळनेर (जि.जळगाव)चे रहिवासी होते. अकोला, अमळनेर, पुणे येथील काही प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश आहे. एमएच ४० एन ९८४८ अशा क्रमांकाची ही बस अमळनेर (जि.जळगाव) आगाराची असून, सकाळी साडेसात वाजता ती इंदूरहून निघाली होती. त्यानंतर सकाळी हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिस व रुग्णालय सूत्राने व्यक्त केलेली आहे. अपघाताची छायाचित्रे व व्हिडिओज सोशल मीडियावर फिरत आहेत. इंदूरवरून ही बस जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे येत होती.
मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक बसमधील तांत्रिक खराबीमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. या बसमध्ये 30 प्रवासी हाेते. आतापर्यंत १3 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. पूर्णक्षमतेने ही बस भरलेली होती. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत हाेते.
बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 30 प्रवासी होते. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करत दु:ख व्यक्त केलं आहे. “ही घटना अत्यंत दु:खद असून ज्यांचा या घटनेत मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो,” असं मोदी यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत टि्वट केलं आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करुन सद्यपरिस्थितीची बाबत माहिती दिली.
एसटी महामंडळाने दिला हेल्पलाईन नंबर
सकाळी ही बस इंदूरहून निघाली होती. वाटेत खलघाटात ही बस नर्मदा नदीत कोसळली आहे. एम.एच. -40 – 9848 असा या बसचा क्रमांक आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने 022/23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे.