Breaking newsHead lines

राष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित!

– महाराष्ट्रात राज्यसभेची पुनर्रावृत्ती?
– काँग्रेस, राष्ट्रवादीचे मते फुटण्याची शक्यता!

मुंबई/नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत तब्बल ६ लाख ६७ हजार मतमूल्य असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आज या निवडणुकीसाठी मतदान पार पडत असून, सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत मतदान केले. एकूण ४८०० खासदार, आमदार मतदान करत आहेत. महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचीच पुनर्रावृत्ती दिसून येत आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादीचीही मते फुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)कडे सुरुवातीला ४ लाख ८० हजार ७४८ इतके मतमूल्य होते. परंतु, अखेर ते ४ लाख १९ हजारांवर घसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे. तरीही अनेक राज्यांत विरोधकांनी आपल्या आमदारांची लपवालपवी केली असल्याचेही दिसून आले.
आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर २१ जुलैरोजी मतमोजणी आहे. एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना तर यूपीएने यशवंत सिन्हा यांना निवडणूक मैदानात उतरवलेले आहे. जास्तीत जास्त मतांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आपली सर्व राजकीय ताकद या निवडणुकीत ओतली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने, भाजप तसेच काही मते फुटून मुर्मू यांना मतदान झाल्याचे सांगण्यात येते. गोवासह काही राज्यांत विरोधकांना मते फुटण्याची भीती वाटल्याने त्यांनी आपले आमदार लपवून ठेवले होते.
दुसरीकडे, द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० पेक्षा अधिक आमदार मतदान करतील, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. निकाल आल्यावर सगळे काही स्पष्ट होईल, असे महाजन यांनी म्हटले. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मविआची आणखी २० मते फुटतील, असा अंदाज बांधला जात आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपच्या बाजूने १६४ आमदारांनी मतदान केले होते. मात्र, भाजपचे नेते द्रौपदी मुर्मू यांना २०० पेक्षा अधिक आमदार मतदान करतील, असा दावा करत आहेत. राज्यात आत्तापर्यंत १०० हून अधिक आमदारांनी मतदान केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनीही आपला मतदानचा हक्क बजावला आहे.

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, त्यासाठी संसद परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!