पाचोड (विजय चिडे) – पैठण तालुक्यातील विहामाडवा येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात खरेदी- विक्रीसाठी १५ ते १८ गावातील ग्रामस्थ येतात ; परंतु , या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने मंगळवारी चक्क चिखलात बसूनच करावा लागल्याचे दिसून आले.
पैठण बाजार समितीची उपबाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणारया विहामांडवा या गावाला परिसरातील १५ ते १८ गावे जोडली गेली आहेत. या गावातील ग्रामस्थ खरेदी- विक्रीसाठी विहामांडवा येथे येतात. या ठिकाणी दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो . दरवर्षी बाजार हाराशी लाखाने होते. या आठवडी बाजारात २०० ते अडीचशे भाजीपाला विक्रेते , व्यापारी येतात. तर खरेदीसाठी १० ते १५ हजार ग्रामस्थांची वर्दळ असते . मागील पाच दिवसांपासून विहामांडवा व परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे . त्यामुळे मंगळवारी नियमितपणे आठवडी बाजार भरला ; परंतु , या बाजाराच्या मैदानात भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला विक्री बसण्यासाठी कोणतीच सुविधा नसल्याने चक्क चिखलात बसूनच भाजीपाला विक्री करावा लागला. परिणामी चिखलाने , घाणीने माखलेल्या भाज्यांची ग्रामस्थांना खरेदी करावी लागली . त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . याकडे प्रशासनाचे पूर्णत : दुर्लक्ष झाले आहे . त्यामुळे ग्रामपंचायतने या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी व्यापारी , भाजी विक्रेते व ग्राहकांमधून होत आहे.