झेडपी, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगित
– ओबीसी आरक्षण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांबणार
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – सर्वोच्च न्यायालयातील आजच्या ओबीसी आरक्षणावरील सुनावणीनंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या आरक्षण सोडतीला स्थगिती दिली आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तो तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोग २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांसाठी १३ जुलैला आरक्षण सोडत जाहीर करणार होते. विशेष म्हणजे ही सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय असणार होती. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आरक्षणाच्या सोडतीची तारीख जाहीर केली होती. त्याबाबतचा आदेशही राज्य निवडणूक आयोगाने काढला होता. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या संदर्भात जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसीसाठी जागा राखून ठेवता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटलेले होते.