ChikhaliMaharashtra

नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर ५० हजाराचे अनुदान द्या!

– जाचक अटी व नियमांमुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
चिखली (तालुका प्रतिनिधी) – महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना २०१९ अंतर्गत नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान मिळणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदाभाऊ खोत यांनी मागणी केली असल्याचे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी सांगितले.
नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे शासनाचे निश्चित केले होते. परंतु याबाबत अनेक जाचक अटी व नियम घातल्यामुळे या कर्जमाफीचा हेतूच संपुष्टात येत असून, बहुसंख्य शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून वंचित रहात आहेत, त्यामुळे शेतकरी वर्गात या अर्धवट अवस्थेतील कर्जमाफीमुळे आणि गेल्या अडीच वर्षात शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे या फसव्या कर्जमाफी योजनेविषयी असंतोष तयार झाला आहे.
२०१९ च्या महापूरमधील पीक नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकर्‍यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, जुलै २०१९ मधे सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात राज्यभरतील शेतकर्‍यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले, याचा पंचनामा करून शासनाने एक हेक्टर मर्यादित पीक नुकसान भरपाई दिली आहे, ही आपत्कालीन संकटात दिलेली पिकाची नुकसान भरपाई आहे, नियमित कर्जदारांच्या कर्जफेडीचा आणि महापुरातील आपत्कालीन परिस्थितीमधील पिक नुकसान भरपाईचा काहीही संबंध नाही, त्यामुळे महापूर काळातील पीक नुकसान मिळालेल्या नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना वगळण्याची अट मागे घेण्यात यावी, तसेच सदर योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांची जाचक अटी व नियमातून मुक्तता करण्यात यावी व त्यांना दिलासा देण्यात यावा, अशी विनंती आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली असता, उपमुख्यमंत्री यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना दिले असल्याची माहिती रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!