Uncategorized

बायगाव खुर्दच्या शेतकर्‍यांचे चोखासागर प्रकल्पात अर्धनग्न आंदोलन

– ‘मोदी योजने’चे १७ लाख रूपये रखडले!

देऊळगावराजा (अनिल दराडे) – पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ व या योजनेचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी बायगाव खुर्द येथील शेतकर्‍यांनी संत चोखा सागर प्रकल्पाच्या पाण्यात अर्धनग्न आंदोलन केले. शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तेजराव मुंडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनामुळे प्रशासनाची काहीकाळ चांगलीच तारांबळ उडाली होती.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून बायगाव खुर्द येथील २९५ शेतकरी वंचित आहेत. प्रशासनाकडे तसेच कृषीमंत्र्यांकडे निवेदन देऊनही मागणी मान्य न झाल्यास अखेर संतप्त या शेतकर्‍यांनी १७ ऑक्टोबरला संत चोखासागर प्रकल्पाच्या पाण्यात अर्धनग्न आंदोलन केले. वंचित शेतकर्‍यांना प्रत्येकी ६ हजार रुपयांप्रमाणे १७ लाख ७० हजार रुपये मिळालेले नाहीत. संपूर्ण गावातील शेतकरीच अनुदानापासून वंचित आहेत. आधीच यावर्षी दुष्काळी स्थिती आहे, त्यामुळे, शेतकर्‍यांनी २९ मार्च २०२३ रोजी तहसीलदारांना निवेदन दिले होते, तसेच ११ एप्रिलला तहसील कार्यालयासमोर १३० शेतकर्‍यांनी उपोषणही केले होते. त्याची दखल न घेतली गेल्याने आजचे हे आंदोलन करण्यात आले. यापूर्वी १७ ऑगस्टला जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तेव्हा प्रशासनाच्या विनंतीवरून आंदोलन मागे घेण्यात आले होते.

२९ सप्टेंबरला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने खडकपूर्णा जलाशयात बायगाव खुर्द शेतकर्‍यांनी १७ ऑक्टोबरला अर्धनग्न आंदोलन केले. या आंदोलनात जवळपास २०० शेतकरी सहभागी झाले होते. त्यात शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तेजराव मुंडे, शिवाजी काकड, संजय गाढवे, कारभारी गाढवे, जगन मांटे, अरुण शेरे, भार्गव गाढवे, रमेश डोईफोडे, विठोबा मांटे, पंडित गाढवे, गुलाबराव जाधव, मुरलीधर जायभाये, भानुदास दहातोंडे, संजय जायभाये, गजानन टेकाळे, कोंडू दहातोंडे, प्रकाश गाढवे, नरहरी खारडे, उत्तमराव गाढवे, शेख निजामभाई, भास्कर पाटोळे आदींचा सहभाग होता.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!