बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील वाडीखुर्द येथील भारतीय वायूसेनेत कार्यरत जवान मिथील दिलीपराव देशमुख यांचे १६ ऑक्टोबररोजी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि.१८) शासकीय इतमामात अंत्यविधी केले जाणार आहेत. या दुर्देवी घटनेने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिथील देशमुख हे बेंगळुरू येथील भारतीय वायूसेनेच्या मेडिकल ट्रेनिंग सेंटर युनिटमध्ये कम्युनिकेशन टेक्निशियन पदावर कार्यरत होते. दि. १६ ऑक्टोबर रोजी कार्यरत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ५ वाजता कर्तव्य बजावत असताना ही दुर्देवी घटना घडली. त्यांना वायुदलाच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृतघोषित केले. वाडी खुर्द येथील रहिवासी माजी सैनिक दिलीपराव देशमुख व मुख्याध्यापक रेखा दिलीपराव देशमुख यांचा मिथील हे कनिष्ठ चिरंजीव होते. भारतीय वायुसेनेत २०११ पासून त्यांनी सेवा दिली. मिथिल यांच्या पार्थिवावर १८ ऑक्टोबररोजी सकाळी १० वाजता हिंदू स्मशानभूमी, वाडी खु. येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मिथिल यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ आदी आप्तेष्ट आहेत.