चिखली तालुक्यात डेंग्युसदृश तापेचे थैमान; आरोग्य यंत्रणा कूचकामी, असोल्यात चिमुकली दगावली!
– असोला येथे डेंग्युसदृश तापेने तीन ते चार रूग्णांवर खासगी रूग्णालयांत उपचार सुरू!
चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यात पुन्हा एकदा डेंग्युसदृश तापेने थैमान घातले असून, शासकीय आरोग्य यंत्रणा कूचकामी ठरली असल्याचे दिसून येत आहे. शेळगाव आटोळ प्राथमिक आरोग्य केंद्रार्तंगत येत असलेल्या असोला या गावात अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा डेंग्युसदृश तापेने बळी गेला असून, याच गावातील तीन ते चार रूग्णांवर चिखली, बुलढाणा व छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. एका बालिकेचा बळी जाऊनही आरोग्य यंत्रणेने काहीच हालचाल चालवली नसून, धूरफवारणी तर सोडाच साधे सर्वेक्षणही केले नसल्याची धक्कादायक बाब चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तातडीने चिखली तालुक्यात लक्ष घालून, या गंभीरबाबीकडे दुर्लक्ष करणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर तातडीने कारवाईची मागणी पुढे आली आहे.
चिखली तालुक्यातील असोला येथे डेंगूसदृश तापेने अनुष्का विनोद चव्हाण (वय २ वर्षे) ही मुलगी मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तसेच, याच गावातील तीन ते चार रुग्ण हे खाजगी रुग्णालय चिखली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगरला उपचार घेत आहेत. शेळगाव आटोळ प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या या गावातील अनुष्का चव्हाण या चिमुकलीचा डेंग्युसदृश तापाने १२ ऑक्टोंबररोजी मृत्यू झाल्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव आटोळे येथील एकाही कर्मचार्याने असोला येथे भेट दिली नाही. त्यामुळे गावात संतापाची लाट आहे.
असोला बुद्रूक येथील लोकसंख्या जेमतेम दीड ते दोन हजार आहे. या लोकांची काळजी घेणे हे आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत कार्यालय असोला यांची जबाबदारी आहे. परंतु असोला येथे ग्रामपंचायतीवर प्रशासकराज असल्यामुळे पूर्ण अधिकार ग्रामसेवक यांना आहे. असोला येथील ग्रामसेवक आठ ते दहा दिवसांपासून गावात दिसलेच नाहीत, असे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे त्यांना या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज वाटली नाही. असोला येथे यापूर्वी धूरफवारणीसुद्धा झालेली नाही, येथे प्रशासक असल्यामुळे सदर ग्रामसेवक हे कधी येतात आणि कधी जातात हे गावातील लोकांना माहिती नाही. याबाबत काही ग्रामस्थांशी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने दूरध्वनीवरुन संपर्क केला असता, त्यांनी सांगितले, की ग्रामसेवक दहा दिवसांपासून गावात दिसले नाहीत. असोला हे गाव शेळगाव आटोळे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत भरोसा उपकेंद्रामध्ये येते. भरोसा उपकेंद्रावर चार कर्मचारी आरोग्य विभागाने नेमले आहेत व ते कार्यरतसुद्धा आहे, परंतु त्यांचे कामे कुठे सुरू आहे, हेच या उपकेंद्रामधील कर्मचार्यांना माहिती नाही.
आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे असोला बुद्रूक येथील डेंग्युसदृश तापाची माहिती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना न मिळाल्याने आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी १२ ऑक्टोंबरपासून आजपर्यंत असोला येथे फिरकलेला नाही. या गावात डेंग्युसदृश तापेची साथ पसरली आहे, याची माहितीसुद्धा आरोग्य विभागाच्या यंत्रणेला किंवा शेळगाव आटोळ आरोग्य केंद्राला नाही, ही धक्कादायक बाबही चव्हाट्यावर आली आहे. मागील जून महिन्यातदेखील चिखली तालुक्यात डेंग्युसदृश तापाने थैमान घातले होते. त्यात एका विवाहितेसह तिच्या चिमुकलीचा बळी गेला होता. तरीदेखील चिखली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सुधारत नसेल तर या आरोग्य विभागाच्या अधिकार्यांवर तातडीने कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
————