बचतगटांनी सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे जयश्रीताई शेळके यांचे आवाहन
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने बुलढाणा येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर ४ व ५ नोव्हेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत राज्य आणि जिल्ह्यातील २०० वर स्टॉल लावण्यात येणार आहेत. महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ही मोठी संधी आहे. बचतगटांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी केले.
येथील सैनिक मंगल कार्यालयात १६ ऑक्टोबर रोजी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. मंचावर करणखेडच्या सरपंच अनिताताई गायकवाड, हतेडी बु. च्या उपसरपंच संगीताताई जाधव, भालेगाव बाजारच्या माजी ग्रा. पं. सदस्य संध्याताई तायडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी महानायिकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थित महिलांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या, महिलांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी. आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये प्रगती साधावी. स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे. बचतगट ही एक आर्थिक चळवळ आहे. जिल्ह्यातील १४०० बचतगट दिशा फेडरेशनसोबत जुळलेले आहेत. बचतगटांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, अर्थसहाय्य, जाहिरात, बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम दिशा फेडरेशनकडून करण्यात येते. बचतगटांनी घेतलेल्या कर्जाचा उपयोग व्यवसाय उभारण्यासाठी करावा. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बचतगटांना रेकॉर्ड वाटप करण्यात आले तसेच रेकॉर्ड भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. बैठकीला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.