– जळक्या प्रवृत्तीची समाजकंटक, व सोंगणीच्या चढ्यादरामुळे शेतकरी मेताकुटीला आला!
चिखली (कैलास आंधळे) – एकमेकांच्या प्रगतीवर जळणारे म्हणा किंवा सूड उगविण्याच्या नादात काही जळक्या प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी सोयाबीनच्या सुड्या जाळून संबंधित शेतकर्यांचे लाखो रूपयांचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री उघडकीस आला आहे. तालुक्यातील बेराळा व रामनगर येथील शेतशिवारात या घटना घडल्या. पोलिस व महसूल प्रशासनाने या घटनांचा पंचनामा केला असून, गुन्हे दाखल केले आहेत. लवकरच आरोपींचा शोध घेण्यासाठी चिखली पोलिसांनी पाऊले उचलली आहेत.
रामनगर येथील शेतकरी रामदास भगत व बेराळा येथील शेतकरी भरत पवार यांच्या सूड्या काल रात्री साडे आठच्या दरम्यान अज्ञात इसमाने पेटून दिल्या. त्यामध्ये सोंगून ठेवलेले सोयाबीन जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी ग्रामस्थ व शेतकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. परंतु, आगीचा भडका मोठा असल्याने काहीही करता आले नाही. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कपील खेडेकर, सचिन बोंद्रे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे सोयाबीनचा पैसा घरात येऊ नये म्हणून जळक्या प्रवृत्तीची माणसे सुड्या जाळत असताना, दुसरीकडे सोयाबीन सोंगणीसाठी चढ्यादराने मजुरी मागितली जात असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मागीलवर्षी सोंगणीची मजुरी २८०० ते ३००० रुपये प्रतिएकर होती. यंदा पीक हातचे गेल्यावरही ३५०० ते ४००० रुपये दरम्यान मजुरीचे दर गेले आहे. काढणी हंगामाच्या प्रारंभी ३२०० ते ३४०० दरम्यान असलेले दर ४ हजारांच्या घरात गेले. मात्र चार हजार देऊनही मजूर मिळत नसल्याने वा त्यासाठी आठवडाभर वाट पहायची वेळ शेतकर्यांवर आली आहे. सुडी लावायची मजुरी ५०० रुपये तर मळणीचा दर २५० रुपये प्रतिपोते (क्विंटल) मोजावे लागत आहे. कडक उन्हामुळे शेंगा झपाट्याने वाळत असल्याने शेतकरी सोंगणीसाठी धडपडत आहेत. बाजारात आलेल्या सोयाबीनला सध्या ४ हजार ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल असा अत्यल्प भाव मिळत आहे. एका एकराच्या सोंगणीइतका हा भाव असल्याने शेतकर्यांचा लागवड खर्चही भरून निघत नाही, असे दुर्देवी चित्र आहे.
—————–