कोतवाल भरतीची लेखी परीक्षा रविवारी; दुसर्याच दिवशी निकाल जाहीर होणार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील कोतवालांच्या रिक्त पदासाठीच्या कालबध्द कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला असून, यानुसार लेखी परीक्षा आता रविवार, दि. २२ ऑक्टोबररोजी दुपारी १२ ते दीड वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे. तर या परीक्षेचा निकाल दुसर्या दिवशी म्हणजे, सोमवार दि. २३ ऑक्टोबररोजी दुपारी तीन वाजेपर्यंत तालुकास्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदर सुधारित कालबध्द कार्यक्रमाचे शुध्दीपत्रक जिल्हाधिकारी ड़ॉ. किरण पाटील यांनी काढले असून, संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना याबाबत कळविले आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील २० जागासाठी ५६७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष बाब म्हणजे, चौथी पास पात्रता असताना बीए, एमए यासह उच्चशिक्षितांनीही कोतवाल होण्यासाठी पसंती दर्शविली आहे.
जिल्ह्यात बरेच वर्षापासून कोतवालपदांची भरती नसल्याने मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. परंतु शासनाने रिक्त पदाच्या ८० टक्के पदे भरण्यासाठी मंजुरी दिली असून, तेराही तालुक्यात उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखालील तालुका निवड़ समितीमार्फत सदर भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अर्ज घेण्याची प्रक्रिया संपली असून, परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादीदेखील संबंधित तालुकास्तरावर जाहीर करण्यात आली आहे. पण यापुढील भरतीच्या कालबध्द कार्यक्रमाध्ये जिल्हाधिकारी ड़ॉ. किरण पाटील यांनी बदल केला असून, तसे शुध्दीपत्रक १३ ऑक्टोबर रोजी काढले आहे. त्यानुसार लेखी परीक्षा आता २२ ऑक्टोबररोजी सकाळी ११ ते १२.३० ऐवजी त्याच दिवशी दुपारी १२ ते १.३० वाजेदरम्यान घेतली जाणार आहे. प्रश्न पुस्तिकेतील प्रश्न व विकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीयअधिकारी तथा निवड़ समिती अध्यक्ष यांच्याकड़े आक्षेप नोंदविणे त्याच दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत, प्राथमिक उत्तर तालिका प्रसिद्ध करणे व अंतिम करणे २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता, अंतिम उत्तरतालिका आधारे उत्तर पत्रिका तपासणी करणे २२ ऑक्टोबर, प्रारूप निकाल (प्रारूप निवड़ यादी व प्रतीक्षा यादी) प्रसिद्ध करणे २३ ऑक्टोबररोजी सकाळी ११ वाजता, प्रारूप निकालावर आक्षेप नोंदविणे / आक्षेप निकाली काढणे २३ ऑक्टोबररोजी दुपारी ३ वाजेपर्यंत, अंतिम निकाल (अंतिम निवड़ व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे २३ ऑक्टोबररोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, निवड़ झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करणे २५ ऑक्टोबर व त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाला अंतिम अहवाल सादर करावा, असे सदर शुध्दीपत्रकात जिल्हाधिकारी ड़ॉ. किरण पाटील यांनी नमूद केलेले आहे.
मेहकर तालुक्यातील भरावयाच्या २० जागांसाठी ५६७ अर्ज आले असून, यासाठीची लेखी परीक्षा जिल्हास्तरावर सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे घेण्यात येणार आहे. असे मेहकरचे तहसीलदार तथा तालुका निवड़ समिती सचिव नीलेश मड़के यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.