– गगनभेदी घोषणा, महिलांचा लाक्षणीय सहभाग, पूनम खंदारे या विद्यार्थिनीने मांडल्या ओबीसींच्या व्यथा!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत इतर मागासवर्गीय समाजाच्यावतीने (ओबीसी) आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. तसेच, राजमाता जिजाऊ मॉसाहेबांना वंदन करून आरक्षण बचावासाठी संघर्ष करण्याची शपथ घेण्यात आली. गगनभेदी घोषणा, हाती बाबासाहेब आंबेडकर अन छगन भुजबळांच्या प्रतिमा, विविध संघटनाचा सहभाग, महिलांची लक्षणीय उपस्थिती अशा थाटात सिंदखेडराजा नगरीत हा ओबीसी आरक्षण बचाव महामोर्चा निघाला. मनोज जरांगे यांच्या जंगी सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा मोर्चा समस्त ओबीसी समाज घटकांच्या ऐक्याचे प्रतिक ठरला होता. देऊळगावराजा येथील पूनम खंदारे या विद्यार्थिनीने ओबीसी विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी सांगून सर्वांचेच लक्ष वेधले.
मनोज जरांगे पाटलांकडून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. तसेच, त्यांनी नुकतीच अंतरवली सराटी, जि. जालना येथे मोठी सभा घेऊन शक्तीप्रदर्शनही केले. त्यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला असून, जरांगे पाटलांच्या मागणीविरोधात हजारो ओबीसी बांधव सोमवारी मातृतीर्थ सिंदखेडराजा शहरात एकत्र आले. ओबीसींच्या आरक्षण बचाव महामोर्चाने केलेले हे आंदोलन लक्षवेधी ठरले. राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून अन्य कोणत्याच समाजाला आरक्षण देऊ नये, अशी जोरदार मागणी ओबीसी आरक्षण बचाव महामोर्चातून करण्यात आली.
यावेळी राजमाता माँ जिजाऊ राजवाड्यासमोरून हा मोर्चा शहरांतील विविध भागातून निघाला. ओबीसी आरक्षण संदर्भातील घोषणांनी शहर दणाणून गेले होते. यावेळी विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांना चिमुकल्या मुलीने व ओबीसी बांधवांनी दिले. पुढे ओबीसी मोर्चाचे रूपांतर उपविभागीय विभागीय कार्यालयासमोर असलेल्या सावता भवन येथे सभेमध्ये झाले. यावेळी ओबीसी आरक्षण बचाव समन्वय समितीचे सदस्य भगवान सातपुते यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देवू नये अशी मागणी करून अंतरवली सराटी येथे ओबीसी नेते छगन भुजबळ यांचेवर अत्यंत खालच्या भाषेत टीका झाली हा प्रकार थांबला पाहिजे, शासनाने आमच्या नेत्यांविरोधात बोलणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. ओबीसी नेत्यांवरील सातत्याने होणारे आरोप यापूढे सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
या महामोर्चात केवळ बुलढाणा जिल्ह्यातीलच नाही तर, मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतून शेकडो ओबीसी समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. जालना येथून १०० मोटारसायकलीवरून २०० ओबीसी कार्यकर्ते मोर्चासाठी आले होते. तसेच, राजवाडा येथून सुरू झालेल्या मोर्चात विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांचा मोठा सहभाग पहावयास मिळाला.