लोणार (उध्दव आटोळे) – लोणार तालुक्यातील दाभा येथील ग्रामसेवक किशोर भाग्यवंत यांची बदली तसेच नाली बांधकाम व ईतर मागणी अनुषंगाने गट विकास अधिकारी पंचायत समिती लोणार यांना निवेदन देऊनसुध्दा निवेदनाच्या अनुषंगाने कार्यवाही न झाल्याने आज, दिनांक 16 ऑक्टोंबरपासून वंचित बहुजन आघाडी लोणार तालुकाच्यावतीने आमरण उपोषणाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी काय करवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
वंचित बहुजन आघाडी लोणार तालुकाच्यावतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती लोणार यांना वरील विषयाचे निवेदन दिनांक 03 आक्टोंबर 2023 रोजी दिले आहे. निवेदनानुसार पंचायत समिती अंतर्गत येत असलेली ग्रामपंचायत दाभा येथे किशोर भाग्यवंत हे ग्रामसेवक प्रदीर्घ कालावधी पासुन कार्यरत असल्याने त्यांचे गावातील एका विशीष्ट गटाच्या लोकांसोबत खास संबंध प्रस्थापित झालेले आहेत. त्यामुळे ते सहाजीकच दुस-या गटातील मंडळीचा द्वेष करतात व त्यांची कामे वेळेवर मार्गी लावत नाहीत. त्यांचे राजकीय संबंध प्रस्थापीत झाल्यामुळे मर्जीतील गटाच्या लोकांना राजकीय फायदा होईल असे वर्तन करतात. त्याच प्रमाणे ग्रामसेवक किशोर भाग्यवंत हे मुख्यालयी वास्तव्य करत राहत नसुन खोटे कागदोपत्री भाडयाने राहत असल्याचे दाखवुन घर भाडे भत्ता शासनाकडुन वसुल करतात.
तक्रारकर्त्यांने केलेले आरोप हे चुकीचे आहे. शिवाय मी एक माजी सैनिक असून पंधरा वर्षे देशासेवा केली आहे. असे कृत्य माझ्या हातुन घडु शकत नाही, माझे काम प्रमाणिकपणे करतो.
– ग्रामसेवक किशोर भाग्यवंत
मौजे दाभा येथे होणा-या विकास कामांना फलक न लावता सदरील कामाची माहिती ही गोपनीय ठेवुन काम शासनाच्या नियमानुसार विहीत मुदतीत पुर्ण न करता विलंब लावतात. गाव नमुना आठ मध्ये जागेची नोंद घेण्यासाठी आर्थिक व्यवहार न केल्यास कागदी घोडे नाचवितात तर दुसरीकडे ज्यांनी आर्थीक व्यवहार केला त्यांच्या जागेची नोंद ग्रामपंचायत दप्तरी कागदपत्रे बरोबर आहे किंवा कशी हे न पाहता तात्काळ करतात. ग्रामपंचायतीच्या जमा व खर्चाची नोंदी व कॅशबुक योग्य वेळी ऑनलाईन करत नाही, ग्रामपंचायतीचे पैसे नियमबाहय रित्या स्वत: जवळ बाळगतात, मौजे दाभा येथील संतोष फकीरा प्रधान यांचे घर मातीचे असुन त्यांच्या घराच्या पुर्वे बाजुला नाली आहे, सदरील नाली ही घराजवळ संपत असल्याने तसेच नालीचा उपसा ग्रामपंचायत करीत नसल्याने नाली गाळल्यामुळे घाणरडे पाणी घराजवळ साचल्यामुळे गटार निर्माण झाली आहे. सदरील घाण पाणी घराच्या भिंतीमध्ये मुरत असल्याने घर कोसळुन मोठा अपघात होवु शकतो. त्याच प्रमाणे ज्ञानबा कुंडली बाजड यांच्या घराकडे जात असतांना पावसाचे पाणी व सांडपाणी जमा होत आहे, त्यामुळे सदरील ठिकाणी वास्तव्य करून राहणारे नागरीक डास व घाण पाण्याच्या दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत. सदरील दोन्ही समस्या निकाली काढुन ग्रामसेवक किशोर भाग्यवंत यांची तात्काळ बदली करावी व त्याचे जागी प्रामाणिक व कर्तव्यदक्ष ग्रामसेवक यांची तात्काळ नियुक्ती करावी तसेच वर उल्लेख केलेल्या समस्यांची नाली बांधकाम करून दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत पुर्तता करावी अन्यथा दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 पासुन पंचायत समिती कार्यालया समोर उपोषण करणार असा इशारा दिलेला होता. सदरील निवेदनाच्या अनुषंगाने कार्यवाही न झाल्याने आज दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 रोजी पंचायत समिती कार्यालयास समोर अखेर उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते महेंद्र भाई पनाड ,तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, तालुका युवा अध्यक्ष गौतम गवई, महासचिव युवा आघाडी, जिल्हा सदस्य महिला आघाडी मालतीताई कळंबे,रमेश प्रधान उपाध्यक्ष युवा आघाडी यांचे सह अन्य वंचित कार्यकर्ते हजर होते.