Uncategorized

‘येलो मोझॅक’मुळे सोयाबीनची झालेली नुकसान भरपाई तात्काळ द्या; सोयाबीन सोंगणीपूर्वी पंचनामे करा!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’ या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले असून उत्पादनात घट येणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ‘येलो मोझॅक’मुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील व बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रश्नाबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने कालच सडेतोड वृत्त प्रकाशित करून प्रशासनासह राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची गांभीर्याने दखल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली आहे.

या निवेदनात नमूद आहे की, बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा आहे. आधीच जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा राहिली आहे. ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. त्यात ‘येलो मोझॅक’ रोगाने शेतकर्‍यांची चिंता अधिक वाढविली आहे. प्रचंड उत्पादन खर्च लावून मोठ्या मेहनतीने उगवलेले सोयाबीन डोळ्यासमोर जातांना पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पिकावर ‘येलो मोझॅक’ नावाचा रोग पडल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडून सोयाबीनचे पिक नेस्तनाभूत होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. गेल्यावर्षी सोयाबीन कापसाला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाला होता, त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. परंतु आस्मानी व सुलतानी संकटाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. राज्य सरकारने ‘येलो मोझॅक’ने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान असूनही पंचनाम्यापासून बुलढाणा जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. जिल्ह्यातील सोयाबीनची परिस्थिती पाहता तातडीने बुलढाणा जिल्ह्यात ‘येलो मोझॅक’ ने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून १०० टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी, सोयाबीन सोंगणीचे दिवस सध्या सुरू होत आहे. त्यामुळे सोयाबीन सोंगणी पूर्वी पंचनामे करावे, अशी मागणी, रविकांत तुपकर यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील व बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

https://breakingmaharashtra.in/buldhana_sayabean/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!