मेहकर (अनिल मंजुळकर) – येथील पलसिद्ध टायर दुकान फोडून लाखोचे साहित्य लंपास करणारा या दुकानाचाच कामगार निघाला असून, त्याला मेहकर पोलिसांनी तांत्रिक तपास व खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमालदेखील हस्तगत करण्यात आला आहे.
सविस्तर असे, की मेहकर येथे दि. २७ ऑगस्टरोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान पलसिध्द टायर दुकान फोडण्यात आले होते. या दुकानातून ३० टिनपत्रे, १२ फुटी २२ लोखंडी पाईप, २० फुटी ५ लोखंडी पाईप व ३ सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी साहित्य चोरीला गेले होते. याबाबत मेहकर पोलिसांत आरोपी प्रविण उर्फ गणेश अजय धोंडगे (वय २५) राहणार भालेगाव, तालुका मेहकर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी गणेश धोंडगे हा पलसिध्द टायर दुकानात काम करीत होता. घटनेनंतर तो पसार झाला होता. त्याने २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान पलसिध्द टायर दुकानात चोरी केली. मात्र पोलिसांना खबर्यांनी दिलेली गुप्त माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी गणेश धोंडगे ह्यास शिताफीने अटक करुन त्याच्या जवळून मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई तपास अधिकारी सम्राट ब्राह्मणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, व पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, याकामी त्यांना पोलीस जमादार मांटे, शहा व गोपनीय माहितीदार यांनी मदत केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सम्राट ब्राह्मणे हे करीत आहेत.