चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील शेलोडी या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेचे शिक्षक येताच त्यांच्यावर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. या शाळेने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा जोपासली असून, त्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
एकीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा ओस पडत असताना, चिखली पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शेलोडी गावामध्ये जिल्हा परिषदेची आदर्श शाळा असून, शाळेत १४५ विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. सदर शाळेतून मागील ५ वर्षांमध्ये दोन विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतन अमरावती येथे शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून प्रवेशित झालेले आहेत. तसेच आजपर्यंत १८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले आहे. यासोबतच तीन विद्यार्थ्यांनी चालू वर्षामध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेशपरीक्षा गुणानुक्रमे उत्तीर्ण करून आपले स्थान नवोदय विद्यालयात कायम केले आहे. यासोबतच या शाळेने सण २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धेत भाग घेऊन जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवीत ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक तत्कालीन जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याहस्ते मिळविले, हे विशेष उल्लेखनीय. एकंदरीत परिस्थितीवरून निश्चितच शाळेचा असलेला उच्चतम दर्जा निदर्शनास येतो. त्याचाच प्रत्यय म्हणून गावकर्यांचे शाळेप्रति असलेले सहकार्य, शिक्षकांची आपल्या कामाप्रति असलेली निष्ठा, शालेय व्यवस्थापन समितीची लोकवर्गणीतून शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आत्मीयता, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वीकारलेले शैक्षणिक पालकत्व या सर्व गोष्टींचा समन्वय असल्या कारणाने समाजाने शिक्षकांप्रति आपले उत्तरदायित्व लक्षात घेऊन आपल्या शाळेतील आदर्श शिक्षकांचा यथोचित सन्मान, शिक्षकांचे स्वागत करून, विद्यार्थी व शिक्षकांसह सहभोजन आयोजित करून सर्व गावकर्यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले.
अशा पध्द्तीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते मॅडम, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब खरात, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कार्य करणार्या शिक्षकांचे शाळेत आगमन होताच शाळेचे मुख्याध्यापक संजय शेळके सर, ज्येष्ठ शिक्षक प्रदीपकुमार रिंढे सर, श्री शिवाजीराव देशमुख स, श्री ज्ञानेश्वर सावळे सर, श्री समाधान जाधव सर, श्री अमरदीप जयशेट्टे सर यासोबतच गावातील सेवानिवृत्त शिक्षक श्री रसाळ सर आणि श्री जाधव सर या सर्वांचे पुष्पहार घालून, पुष्पगुच्छ देऊन, शाल श्रीफळ देऊन व विद्यार्थ्यांच्या पुष्पवृष्टीसह टाळ्यांच्या गजरात अनोख्या पध्द्तीने स्वागत केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.