शेळगाव आटोळच्या ग्रामसेवकाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; सात दिवसांत बदली करा, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार!
– ‘सरपंच काय बोळ्याने दूध पितात काय?; असे महिला सरपंचांना म्हणणे अंगलट येणार?
– जाब विचारणार्या ग्रामस्थांना ‘३५३’ दाखल करण्याची ग्रामसेवकाची धमकी
चिखली (महेंद्र हिवाळे) – स्वातंत्र्य दिनी झालेली शेळगाव आटोळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली. या सभेत ग्रामसेवकाने ग्रामस्थांना अरेरावी करत ३५३चा (सरकारी कामात अडथळा आणणे) गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी चिखलीच्या गटविकास अधिकारी (बीडीओ)कडे लेखी तक्रार दाखल करत, ग्रामसेवक संदीप रिंढे यांची तातडीने बदली करण्याची व कारवाई करण्याची मागणी केली आहे. सात दिवसांत बदली न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचाही इशारा देण्यात आला आहे. भरग्रामसभेत ग्रामसेवकाने महिला सरपंचाविषयीदेखील अश्लाघ्य भाषा वापरली, ‘सरपंच काय बोळ्याने दूध पितात काय’? असे हे ग्रामसेवक म्हणाल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारअर्जात नमूद आहे.
शेळगाव आटोळ येथील ग्रामपंचायत सरपंच सौ.सुरेखा राजे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ ऑगस्टरोजी १५ ऑगस्टरोजीच्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेला गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती. गावकर्यांनी कामकाजाबाबत विचारणा केली असता, ग्रामसेवकाने अरेरावी सुरू केली. या ग्रामपंचायतीमध्ये ११ सदस्य असून, वैदू समाजाच्या सौ. सुरेखा सुरेश राजे या सरपंच म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून कामकाज पाहात आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्या पासून ग्रामसेवक संदीप रिंढे हे काही लोकांना हाताशी धरून विकासकामांत अडथळा निर्माण करतात. त्यामुळे गावातील अनेक विकासकामे रखडून पडली आहेत. ३१ ऑगस्ट रोजी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामसभेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले असता, ग्रामसभा असल्याने गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. ग्रामसभेत ग्रामस्थांनी सचिवाला विकासकामांबद्दल विचारणा केली असता, उलट रिंढे यांनी ग्रामस्थांची समजूत न घालता अरेरावी दाखवत वाद घातला. त्यांनी अक्षरशः ‘सरपंच का बोळ्याने दूध पितात का? मी सरपंचाला काहीच समजत नाही. मी काय तुमचा नोकर आहे का? माहिती मागणार्या नागरिकांना तुमच्यावर ३५३ नुसार गुन्हे दाखल करेल’, अशा प्रकारचे सरपंच सुरेखा राजे यांच्या बाबतीत अपशब्द वापरले. तसेच, ग्रामस्थांना सरळ सरळ कायद्याचा दुरूपयोग करण्याची धमकी दिली. ग्रामसेवकांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे ग्रामसभेत गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी चिखली पंचायत समितीमध्ये धाव घेऊन वादग्रस्त सचिवांची तात्काळ बदली करून करून कार्यवाही करण्यात यावी. जर अधिकार्यांनी तात्काळ दखल घेऊन सात दिवसांच्याआत कार्यवाही न केल्यास सर्व गावकरी ग्रामपंचायतीला टाळे ठोको आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. ग्रामस्थांच्या या आंदोलनाला प्रशासन जबाबदार राहील, असेही गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.
या निवेदनावर सागर आराख, दीपक जाधव, संदीप बोर्डे, पृथ्वीराज बोर्डे, वैभव बोर्डे, साहेबराव बोर्डे, प्रकाश बोर्डे, मनोहर आराख, विशाल बोर्डे, सचिन बोर्डे, नारायण बनकर, शरद बोर्डे, हर्षल बोर्डे, सिद्धार्थ राऊत, विनोद शिंदे, उदय सुरडकर, श्याम साबळे, रमेश डहाळे, राजेश साळवे यांच्यासह अनेक गावकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
दरम्यान, विश्वासनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक रिंढे यांनीच सरपंच व सरपंचपतीच्या त्रासाला कंटाळून डिसेंबर २०२२मध्येच गटविकास अधिकारी यांच्याकडे बदलीसाठी अर्ज दिलेला आहे. तथापि, गावातील गटबाजीचे राजकारण व सरपंचपतीच्या हस्तक्षेपामुळे या ग्रामपंचायतीला येण्यास कोणताही ग्रामसेवक तयार होत नाही. त्यामुळे रिंढे यांच्याकडे नाईलाजाने का होईना या ग्रामपंचायतीचा कार्यभार आहे. तसेच, सरपंच यांचा ग्रामसेवक आणि सदस्य यांच्यावर विश्वास नसल्याने १५ व्या वित्त आयोगाचा जवळपास ७० लाख रूपयांचा निधी पडून असल्याची माहितीही शेळगाव आटोळ येथील विश्वासनीय सूत्राने खासगीत दिली आहे.
———-