SOLAPUR

कांदा अनुदानाच्या अर्जाची युद्धपातळीवर तपासणी!

सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सध्या कांदा अनुदानाच्या अर्जाची युद्ध पातळीवर तपासणी करण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसात ही तपासणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याचा आढावा बुधवारी शहर उपनिबंधक प्रगती बागल यांनी घेऊन संबंधित ऑडिटरला प्रस्तावाची कसून तपासणी करण्याच्या सक्त सूचना दिल्या.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा अनुदानासाठी जवळपास ३८ हजार दोनशे शेतकर्‍यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावाची तपासणी सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये केली जात आहे. राज्य सरकारने कांदा अनुदान जाहीर केल्यानंतर शेतकर्‍यांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात आले आहेत. कांदा कवडीमोल दराने विक्री केल्यामुळे शासनाने प्रति क्विंटल तीनशे रुपयाचे अनुदान जाहीर केले आहे.

कांदा अनुदानाचे प्रस्ताव तपासण्याचे कामासाठी किमान एक आठवडा तरी लागेल. परंतु यामधील पात्र-अपात्र प्रस्ताव किती होतील हे अद्याप सांगता येणार नाही.
– प्रगती बागल, शहर उपनिबंधक

दरम्यान, कांदा अनुदानाच्या प्रस्तावामध्ये काही बोगस पावत्या जोडून शेतकर्‍यांनी प्रस्ताव सादर केले असल्याची चर्चा देखील बाजार समितीच्या आवारात होत आहे. तर दुसरीकडे जे प्रामाणिक शेतकरी कांदा लागवड केलेले आहेत असे देखील शेतकरी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे जे खरोखरच कांदा विक्री केलेले शेतकरी आहेत अशा शेतकर्‍यांना शासनाचे अनुदान मिळावे अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकर्‍यांमधून होत आहे. परंतु जे बोगस पावत्या जोडून कांदा अनुदान लाटण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना बाजूला सारण्याचे मोठे कौशल्य प्रशासनाने दाखविणार का याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी शासनाची नियमावली फॉलो करण्याची कसोटी ऑडिटरचे असणार आहे. दरम्यान, कांदा अनुदानाचे अर्ज भरून आज दोन महिने लोटले तरी अद्याप कांदा अनुदानाचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे हे अनुदान कधी मिळणार असा प्रश्न सध्या शेतकर्‍यांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!