Uncategorized

टाळ मृदंग गर्जती! माझ्या विठ्ठलाची कीर्ती!!

टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा||
माऊली निघाले पंढरपूरा..,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ||

पंढरीचे वारकरी आम्ही… टाळ मृदंग वीणा हेच आमचे हरीसी चिदरूप होण्याचे साधनं… अखिल अकोट ब्रम्हांडनायक पंढरीचा पांडुरंग परमात्मा भक्तांच्या भेटीसाठी युगानुयुगं पासून चंद्रभागेच्या वाळवंटात उभा आहे. चंद्रभागेच्या तिरी! उभा विटेवरी! तो हा पांडुरंग हरी! म्हणा रामकृष्ण मुखे!! वर्षातून चार वेळेला आम्ही पांडुरंग परमात्म्याच्या वारीला वारकरी पाईपाई भेटीला जातो. आषाढी वारी, माघी वारी, कार्तिकी वारी मार्गशीर्ष वारी… दर पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसाला एकादशीला पांडुरंगाला भेटायला जाणाऱ्या भाग्यवंत भक्तजनांची कमतरता नाही. टाळमृदंगाच्या गजरात त्याचे गुणगान करत जायचे. कोणतीही अपेक्षा नाही. फक्त पांडुरंगाच्या मुखाचे आणि चरणाचे सुख आणि परमानंदाची अनुभूती घेण्यासाठी पाय पंढरीकडे वाढतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी! कर कटावरी ठेवून या!!या पांडुरंगाचे रूप आणि ध्यान आम्हाला नेहमीच बोलावत असते. तसा तो तर आमच्या हृदय मंदिरात विराजमान आहे. मात्र तरीही पंढरीच्या पांडुरंगाचे मुखदर्शन होणे या मधील सुख काही वेगळेच आहे.
सुखाचा सोयरा असलेला हा पांडुरंग परमात्मा आमचा माय, बाप ,बंधू ,चुलता ,सखा तोच आहे. त्याच्या दर्शनाने आमच्या जीवनामधील पाप, ताप ,कष्ट, क्लेश दूर होतात. आमची तशी श्रद्धाच आहे.
टाळ मृदुंग वीणा हाती घेवू पांडुरंगा तुझे गुण गाऊ || धृ ||
पांडुरंगाला काही मागायचे नाही. फक्त नेत्र भरी त्याचे दर्शन घ्यायचे. या नेत्र दर्शन सुखाचा सोहळा अनुपम असाच आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम गजर करत पंढरीच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तिरी स्नान करायचे. या दैवताचे दर्शन घ्यायचे एवढाच वारकरी वैष्णवांचा एक कलमी कार्यक्रम असतो. लक्षावधी संतांच्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारात दर्शनाच्या सोहळ्यातून आणखी वेगळा आनंद देत असतो. झाले संतांचे दर्शन….. ही अनुभूती आम्हाला वारंवार येते.
श्रीसंत नामदेव महाराज यांचा अभंग सुप्रसिद्ध आहे. महाराज या अभंगात म्हणतात,
काळ देहासी आला खाऊं।
आम्ही आनंदें नाचूं गाऊं।।१।।
कोण वेळे काय गाणें।
हें तो भगवंता मी नेणें।।२।।
टाळ मृदंग दक्षिणेकडे।
माझें गाणें पश्चिमेकडे।।३।।
नामा म्हणे बा केशवा। जन्मोजन्मीं द्यावी सेवा।।४।।
आम्ही जन्माला आलो आहोत तर एक दिवस मृत्यू निश्चित आहे. आमच्या या नश्वर देहावर काळाची उडी पडायच्या आत टाळ आणि मृदंग घेऊन भगवंताचे भजन आणि कीर्तन करायचे त्याचे दर्शन घ्यायचे आनंदाने नाचत वाचत काळाच्या स्वाधीन व्हायचे. जन्मोजन्मी आम्हाला या पांडुरंग परमात्म्याचा सहवास लाभावा हीच साऱ्या संतांची भावना आहे.
वैष्णव गजरी आनन्दे ||
इनामाची भरली पेठ ।
भू वैकुंठ पंढरी ॥१॥
चंद्रभागा वाळुवंट ।
संत घनदाट नाचती ॥२॥
टाळ मृदंग मोहरी ।
वैष्णव गजरीं आनंदें ॥३॥
पंढरपूर म्हणजे आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी दिलेली मोठी पेठ आहे. या आनंदाच्या पेठेमध्ये भूवैकुंठ धावून पांडुरंग परमात्मा संतांच्या भेटीला येत असतो. टाळ मृदंग वाजवत आम्ही आनंदाने नाचत असतो.
चोकोबार आहे या अभंगात म्हणतात की पांडुरंगाच्या आणि संतांच्या चरणी लोटांगण घेतल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही.
चोखा जातो लोटांगणीं ।
घेत पायवणी संताची ॥४॥
खरोखर टाळ-मृदंगाच्या गजरात पांडुरंगाचे भजन आणि कीर्तन म्हणजे आनंदाचा सोहळा आहे.
पंढरीत गेल्यानंतर आमची काया हीच पंढरी होऊन जाते आणि आत्मा हा विठ्ठल विठ्ठल होऊन आम्ही पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय असा गजर करत असतो.
त्याला आम्ही काही मागतच असे नाही मागायची तर काय….
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा… जगद्गुरू तुकोबाराय यांचे हे पसायदान आहे.
आमचा पांडुरंग परमात्मा भक्तजनांच्या जीवनामध्ये कोणत्या घडीला काय चमत्कार घडवेल ते काही सांगता येत नाही. मात्र त्याचे दर्शन ,संतांचा सहवास, कीर्तना मधून भक्तीचा आनंद, भजनातून श्रवणभक्ती, राम कृष्ण हरी नामाचे अखंड चिंतन अशा या भक्ती रसाच्या विविध रंगातून आणि अंगातून टाळ-मृदंगाचा सुगंध आम्हाला ऊर्जा प्रदान करतो. भक्त जनांचा भाव जागृत करतो. मन आनंदाने स्फुल्लिंग पावते. आनंदाची ऊर्जा आम्हाला मिळत असते.
वारकरी वैष्णव जनांचे देहभान विसरून जाते. तीमध्ये चींब धावून काढणारा देहभान विसरायला लावणारा अंतर्यामी पांडुरंग परमात्मा हा ब्रम्ह आनंदासाठी त्याच्या पंढरी क्षेत्राची वारी आम्हाला वारंवार घडवत असतो. आमच्या वारीची ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. टाळमृदंगाच्या गजरामध्ये संसाराची आसक्ती सुटुन जाते. अहंकाराचा वारा दूर पडतो. काम, क्रोध, लोभ ,मोह ,मद, मत्सर हे षड्रिपू देहापासून अलिप्त होतात.अहर्निश पांडुरंग परमात्म्याचे मनन-चिंतन भजन श्रवण अभंग गायन यामध्येच जीवन व्यतीत होत असते. श्वास आणि विश्वास आमचा विठ्ठलमय झालेला असतो. त्याने आम्हाला एवढे वेड लावले आहे की राम कृष्ण हरी नामस्मरणात शिवाय आम्हाला काहीच सुचत नाही.
टाळ-मृदंगाचा जेव्हा ब्रम्हानंद नाद लागतो त्या वेळेला हा पांडुरंग परमात्मा आम्हाला त्याच्या पाऊल वाटेवर भेटणार या वृक्षात प्राण्यांमध्ये माणसांमध्ये तोच दिसत असतो. माऊली माऊली गजर होत असताना आमच्या श्वासांमध्ये अखंड आत्मा आनंदाचा झरा वाहत असतो. प्रचंड ऊर्जा आम्हाला प्राप्त होत असते.
आमची वारी ही माणसासाठी आहे, मानवता धर्मासाठी आहे, मानवी जीवन प्रकाशमय करण्यासाठी आहे. भक्तीतून मुक्ती मिळविण्याचा मार्ग म्हणजे वारकऱ्यांची वारी आहे.

( लेखक – प्रा.रामकृष्णा महाराज पाटील, जामनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!