संतभार पंढरीत दाखल; विठूमाऊलीच्या चरणी १२ लाख भाविक!
– उद्या पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सहकुटुंब शासकीय महापूजा!
पंढरपूर (सोनिया नागरे) – आळंदी येथून निघालेले ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊली व देहू येथून निघालेले जगदगुरू तुकोबाराय यांच्यासह संतांच्या पालख्या आज सायंकाळी भूवैकुंठ पंढरपुरात दाखल झाल्यात. आषाढी यात्रेच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागासह कर्नाटक व तेलंगणामधून भाविकांचे पंढरीत आगमन सुरू असून, जवळपास १० ते १२ लाख भाविक दाखल झाले आहेत. सद्या दर्शनरांग १० नंबर शेडच्या पुढे गेली असून, दर्शनासाठी १८ ते २० तास लागत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. मुखदर्शनाचीही रांग लांबपर्यंत गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासकीय महापुजेसाठी पंढरपुरात दाखल झाले असून, त्यांच्याहस्ते सहकुटुंब उद्या (दि.२९) पहाटे २.२० ते ४.३० या वेळेत ते शासकीय महापूजा करणार आहेत.
आज सायंकाळी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या लाखो भाविकांसह पंढरपुरात दाखल झालेत. संतभार पंढरीत पोहोचताच विठ्ठलनामाचा गजर शिगेला पोहोचला होता. तर संतांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला होता. भीमा नदीकाठावरही वारकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व अन्य जिल्ह्यातील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होत नसल्याचे दिसून आले. पंढरपूर शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलले असून, वारकरी व भगव्या पताकांनी व्यापून गेले आहेत. याशिवाय, रेल्वे, एसटी व आपल्या खासगी वाहनातून आलेल्या लाखो भाविकांच्या आगमनाने पंढरपूरमधील गर्दी वाढली आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसर, भक्ती सागर (६५ एकर), प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट, पत्रा शेड दर्शनरांग भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून शेड उभे केले आहेत. या शिवाय, आरोग्य, पिण्याचे पाणी, नाष्टा दिला जात असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त तसेच गर्दीच्या ठिकाणी ‘माउली पथक’ पोलीस प्रशासनाने तैनात केले आहे. यंदा जादा एस.टी बसेस सोडण्यात आल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त दिसून आली. आरोग्य विभागाच्या महाआरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
२९ जूनरोजी मध्यरात्री २:२० वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा होणार आहे. ती पहाटे ४ वाजेपर्यंत चालणार आहे. या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री सहकुटुंब हजर राहणार असून, या शासकीय पुजेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठलाला काय साकडे घालतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
—————-