सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी १४ मार्चपासून सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप होता. या संपात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर, येथील सर्वच नियमित कर्मचारी व परिचारिका १००% सहभागी झाले होते. परंतु अशा वेळी सिव्हील मधील रुग्णसेवा ठप्प होईल की काय अशी भीती होती. नियमित कर्मचाऱ्यांच्या संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आलेल्या रुग्णाला आधार देत ही सेवा पूर्ण केली.
श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, हे पुणे – हैद्राबाद महामार्गावर असल्याने अपघात ग्रस्त रुग्ण रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होतात. तसेच या रुग्णालयात कर्नाटक सीमावर्ती भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. विस्तीर्ण अशा पाच विभागांत विखुरलेल्या रुग्णालयात रुग्णसेवा पुरविण्यासाठी वर्ग ४ कर्मचाऱ्यांची कमतरता कायमच भासत असून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपकाळात ती अधीकच भासू लागली. परंतु १० वर्षांपासून कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा व अनुभवाचा वापर करून, या संप काळात 24 तास सेवा करुन अतिशय जबाबदारीने रुग्णसेवा केली. कोणत्याही प्रकारचा गोंधळ, ओरड होऊ दिलेली नाही. या काळात जवळपास १२१ शस्त्रक्रिया पार पडल्या. यापैकी स्त्री शस्त्रक्रिया ७७ (गायनिक), शल्य चिकित्सा शस्त्रक्रिया २१ (सर्जरी) व अस्थिरोग शस्त्रक्रिया २३( orthopaedic). सदर शस्त्रक्रिया डॉक्टरांनी अनुभवी रोजंदारी कर्मचारी यांच्या सहाय्याने यशस्वी रित्या पार पडल्या. याच प्रमाणे रुग्णालयातील medicin icu, trouma icu, nicu या अतिमहत्त्वाच्या विभागात देखील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने रुग्णसेवा केली. तसेच रुग्णांसाठी जेवण तयार होणाऱ्या स्वयंपाक गृहात इतर वेळी ११ कर्मचारी काम करत असतात. परंतु संप काळात फक्त सहा अनुभवी रोजंदारी महिला कर्मचाऱ्यांनी जीवाच रान करून कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होऊ देता नियमित वेळात रुग्णांसाठी चहा, नाष्टा व जेवण तयार केले आहे.
प्रत्येक संप काळात रोजंदारी कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे रुग्णसेवा पुरविली आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही. या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामाचा अनुभव मोठा असल्यामुळे हे करु शकले. म्हणूनच दहा ते बारा वर्षांपासून रिक्त असलेल्या वर्ग चार च्या पदांवर नियमित स्वरूपात सामील करून घेणे संदर्भात “रोजंदारी कर्मचारी संघटना” सोलापूर यांच्या कडून स्थानिक प्रशासन व शासन यांना वारंवार निवेदने सादर करीत आहे. या वेळेस तर स्थानिक प्रशासन व शासन या कामगारांचा सहानुभूती पूर्वक विचार करून होणाऱ्या भरती प्रक्रियेत विनाअट सामील करून घेण्याची मागणी या रोजंदारी कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.