– मेहकर आगारातील चित्र – सर्वसामान्यांची एसटी आता खचाखच!
– सैलानी यात्रेमुळे १० लाखाची कमाई, मेहकर आगाराला महिनाभरात २० लाखाचे उत्पन्न!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य शासनाचे अनेक महामंडळे तोट्यात आहेत. त्यातील महत्वाचे व तितकेच सामान्य जनतेशी निगड़ीत असलेले महामंडळ म्हणजे राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी होय. पण या मंड़ळालासुध्दा आपला गाड़ा हाकण्यासाठी सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यासाठी महामंड़ळ वेगवेगळ्या सवलती व सुरक्षित सेवेची हमी देवून प्रवासी आपल्याकड़े ओढते. गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेचा ३३ हजार महिलांनी लाभ घेतला असून, मेहकर आगाराला या पोटी नऊ लाख तर सैलानी यात्रेच्या माध्यमातून १० लाख असे जवळजवळ २० लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.
पैसा सर्व काही नाही हे खरे असले तरी पैशाशिवाय काही नाही, हेही मात्र कोणी नाकारू शकणार नाही, कारण दैनंदिन गरजा व व्यवहार चालवण्यासाठी पैशाची नितांत गरज असते. त्यासाठी सर्वच धड़पड़त असतात. शासनाचेसुध्दा यापेक्षा वेगळे काय असणार? शासनाचे अनेक महामंडळे तोट्यात आहे. त्यातील सामान्य जनतेशी निगडीत महामंडळ म्हणून एस. टी. महामंडळाकड़े पाहिले जाते. गेली दोन वर्ष कोरोनामुळे एस. टी.ची प्रवासी वाहतूक बंद होती. परिणामी, कर्मचार्यांचे पगार, मेण्टनन्स व इतर आवश्यक खर्चासाठी महामंडळाची चणचण होती. महामंडळ जेष्ठ नागरिक, विद्यार्थी प्रवास सवलत, अपंग, वयोवृद्धसह इतर प्रवाशांना प्रवास भाड्यात विविध सवलती देते. त्यामागे एस. टी.चे उत्पन्न वाढावे हा उद्देश असतो. याला अवैध प्रवासी वाहतूक, अनियमित बसफेर्या, नियोजनाचा अभाव व इतरही बाबी कारणीभूत ठरतात, हा भाग वेगळा. राज्य शासनाकड़ून महिला सन्मान योजनेतून महिलांना एस. टी.मध्ये प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत देण्यात येत आहे.
गेल्या १७ मार्चपासून सुरू झालेल्या या योजनेचा आजपर्यंत ३३हजार १२० महिलांनी लाभ घेतला असून, मेहकर आगाराला ८ लाख ९८ हजार ३८५ रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे, तर गेल्या ४ मार्चपासून सैलानी यात्रेसाठी चालविलेल्या बसफेर्यांपासून जवळजवळ ९ लाखापर्यत उत्पन्न मिळाले आहे. त्यासाठी नव्यानेच रूजू झालेले आगारप्रमुख जोगदंड़े तसेच चालक व वाहक यांनीही मेहनत घेतली. महिला सन्मान योजनेमुळे एस.टी. बस खचाखच भरून जात असताना मात्र खाजगी तीन व चारचाकी वाहनांना प्रवासी मिळवण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. राज्य परिवहन महामंडळाकड़ून प्रवासासाठी विविध सवलत देण्यात येते. एस.टी.चा प्रवास सुरक्षित असून, प्रवाशांनी याचा फायदा घेऊन एस.टी.नेच प्रवास करावा, असे आवाहन मेहकर चे आगारप्रमुख जोगदंड़े यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना केले.
—————-