BULDHANALONARVidharbha

शेतकर्‍यांच्या खात्याला लावलेले ‘होल्ड’ काढा; अन्यथा मंगळवारी लोणार येथे स्टेट बँकेसमोर ठिय्या आंदोलन!

– तहसीलदारांसह एसबीआयच्या लोणार शाखाधिकार्‍यांना दिले पत्र

लोणार/बिबी (ऋषी दंदाले) – भारतीय स्टेट बँकेच्या लोणार शाखेने पीक कर्जाचे नूतनीकरण करण्याच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या खात्याला होल्ड लावलेले आहे, तरी २८ मार्चपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्याचे ‘होल्ड’ न काढल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने भारतीय स्टेट बँक शाखा लोणार समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी तहसीलदार लोणार व शाखा अधिकारी भारतीय स्टेट बँक लोणार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

काही वर्षा अगोदर पीककर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या पीककर्जाचे नूतनीकरण करण्याच्या नावाखाली भारतीय स्टेट बँक लोणारच्या वतीने शेतकर्‍यांच्या खात्याला होल्ड लावण्यात आलेले आहे. जमीन ही शेतकर्‍यांची असून त्यावर किती कर्ज घ्यावे व नूतनीकरण करावे की न करावे, हा संपूर्ण अधिकार शेतकर्‍याचा असून, बँक प्रशासन खात्याला होल्ड लावून शेतकर्‍यांवर नूतनीकरण करण्यासाठी दडपशाही करत आहे. शेतकर्‍यांच्या खात्याला होल्ड असल्यामुळे निराधार शेतकरी श्रावण बाळ, पीएम किसान योजनांचे आलेले अनुदानसुद्धा आपल्या खात्यामधून काढू शकत नाही.

बँक खात्यामध्ये पैसे असूनही शेतकर्‍यांना दवाखान्याच्या कामासाठी व इतर काही अतिमहत्त्वाच्या कामासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. तरी २८ मार्च, मंगळवारपर्यंत भारतीय स्टेट बँक शाखा लोणारच्या वतीने शेतकर्‍यांच्या खात्याचे होल्ड न काढल्यास २८ मार्चला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने होल्ड लागलेल्या शेतकर्‍यांना सोबत घेऊन भारतीय स्टेट बँक शाखा लोणार समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!