बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मालगाड़ीतील कोळशाला लागलेली आग विझवण्यासाठी एकच धावपळ केल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना २५ मार्च रोजी दुपारी शेगाव रेल्वे स्थानकावर घड़ली.
नागपूरजवळील उमरेड़ येथून गुजरातकड़े कोळसा घेऊन जाणार्या एका मालगाड़ीतील बोगी क्रमांक सातमधील कोळशाने अचानक पेट घेतला होता. ही बाब नागझरी रेल्वे स्टेशन प्रबंधक प्रसाद पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदरची माहिती लगेच शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना दिली. शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे यांनी योग्य ती खबरदारी घेत सदर मालगाड़ी शेगाव येथील प्लॅटफॉर्म क्रमाक तीनवर घेऊन वीजपुरवठा बंद केला. शेगाव अग्निशामक दलाने तातड़ीने येवून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे, आरसीएफचे पोलीस अधिकारी प्रविण, महीला पोलीस वैशाली वाकोड़े व इतर कर्मचारी हजर होते.