मेहकर (तालुका प्रतिनिधी) – येथील शारंगधर नगरातील रहिवासी असलेले शिक्षक विजय पोटरे (वय ३८) यांनी काल , दि. २५ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास जामगाव रोडवरील एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील घाटबोरी येथील जिल्हा परिषद शाळेवर ते शिक्षक म्हणून कार्यरत होते.
शिक्षक विजय शामराव पोटरे हे काल सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान फिरायला जातो असे सांगून घराबाहेर पडले. मात्र सात वाजेपर्यंत ते घरी आले नसल्यामुळे घरच्यांनी आणि मित्रपरिवाराने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सापडून न आल्याने त्यांनी मेहकर पोलिस स्टेशन गाठले. माजी उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया हेसुद्धा यावेळी पोलिस ठाण्यात आले. तपासांती रात्री उशिरा जामगाव रस्त्यावर डॉ. आनंद सावजी यांच्या शेतात विजय पोटरे यांचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने मेहकरमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या पार्थिवावर सकाळी शाेकाकुल वातावरणात जानेफळराेड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
——————