बुलडाणा (खास प्रतिनिधी) : जिल्ह्यात महिला बचतगटांची चळवळ सक्रिय आहे. मात्र बचतगटांसमोर अनेक अडचणी असून त्या सोडवण्याची गरज आहे. बचतगटांना लागणारा कच्चा माल, ब्रँडिंग, गुणवत्ता मापदंड, बाजारपेठ, विक्री आणि सर्व प्रकारचे प्रमाणपत्र एकाच छताखाली उपलब्ध व्हावे याकरिता लवकरच ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ उभारणार असल्याचे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ बुलढाणाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या बचतगटांच्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शनाचे शनिवारी जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे उदघाटन झाले. याप्रसंगी बचतगट चळवळ आणि बाजारपेठ याबाबत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. संदीप शेळके म्हणाले, महिला बचतगट चळवळीला जुना इतिहास आहे. बांग्लादेशचे प्रा. मो. युनूस यांनी १९७० मध्ये महिला बचतगटाची स्थापना केली. त्यानंतर ही चळवळ जगभर पसरली. भारतात, महाराष्ट्रात आणि त्यातही आपल्या बुलढाणा जिल्ह्यात बचतगटांचे चांगले नेटवर्क आहे.जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिला बचतगटांशी जुळलेल्या आहेत. विविध पतसंस्था, बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी व्यवसाय उभारले आहेत. महिला आर्थिक व्यवहारात चोख असतात. घेतलेले पैसे वेळेवर भरतात. त्यामुळे एकाही महिलेचे खाते थकीत नाही. राजर्षी शाहू परिवाराने बचतगटांच्या माध्यमातून २० हजार महिलांना ७० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे.
‘माविम’, ‘उमेद’चे काम चांगले!
बचतगटांच्या उत्पादनांना हवी तशी बाजारपेठ मिळत नाही. यासंदर्भात भरीव काम करण्याची गरज आहे. माविम, उमेद ह्या शासकीय संस्थांचे काम चांगले आहे. परंतु त्यांना व्यवसाय करण्याबाबत मर्यादा आहेत. यासाठी काम करणारी एखादी संस्था जिल्हयात असली पाहिजे याकरिता पुढाकार घेणार असल्याचे संदीप शेळके यांनी सांगितले.