बारामती अँग्रोवरील कारवाईमुळे सुभाष गुळवे यांचे मानसिक संतुलन ढासळले – डॉ. सुनील गावडे
कर्जत (प्रतिनिधी) – बारामती अँग्रो साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मंडळ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले असून, यानंतर या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांनी एक व्हिडिओ प्रसीद्ध करून थेट आ. राम शिंदे वर आरोप केले. त्यास उत्तर म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांनी प्रसिध्दी पत्रक काढून जहरी टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
बारामती अँग्रोच्या नावाने शेटफळ गडे येथे असलेल्या साखर कारखान्याने नियम मोडत लवकर कारखाना सुरू केल्याच्या विषयात आ. राम शिंदे यांनी थेट विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केल्याने भाजप शिवसेना सरकारने महाराष्ट्र शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून व्यवस्थापकीय संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला. या पार्श्वभुमीवर बारामती अँग्रो साखर कारखान्याचे
व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांनी थेट आ. राम शिंदे वर एकेरी भाषेत टीकेची झोड उठवल्यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे यांनी त्यांना उत्तर देताना या कारवाईमुळे सुभाष गुळवे यांचेच मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका केली असून यात म्हंटले आहे की, याबाबत यापूर्वी आपल्याला शेतकरी हिताचा खूप कळवळा आहे हे दाखविण्यासाठी कारखाना सुरु केला होता म्हणणारे आता मात्र साखर कारखाना सुरूच केला नव्हता असे म्हणत आहेत. मागील वर्षी अतिरिक्त उसासाठी शेतकरी आंदोलन करत होते . आमदार राम शिंदे साहेब यांनी रास्ता रोको केला होता त्यावेळी तत्कालिन पवार प्रणित मविआ सरकार आमदार राम शिंदे व भाजप कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करत होते.
मागच्या हंगामात ऊस कारखाने ऊस नेत नसल्याने अनेक शेतकरी ऊस पेटवत होते त्याच वेळी हेच गुळवे व त्याचे चेले तालुक्यात टिपरु शिल्लक ठेवणार नाही असे ऐका बाजूला म्हणत असताना शेतकऱ्याची अवस्था सर्वांनी पाहिली होती. राज्यातील फक्त एकच कारखाना सुरु होऊन संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांचे भले कसे होणार होते? असा प्रश्न उपस्थित करताना, महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या गाळप तारखेच्या अगोदर कारखाने सुरु करून कोणाचे हित साधणार होते, खरंच शेतकऱ्याच्या हितासाठी असते तर आ. पवार यांनी महाराष्ट्र शासनालाच गाळप तारीख बदलण्यासाठी भाग पाडायला पाहिजे होते, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्यांचे हित तरी साधले असते? असे म्हणत खोटे बोलताना भान ठेवा… शेतकरी हिताची कोल्हेकुई तुमच्या सारख्या साखर सम्राटांनी करावी .? हे वास्तवाच्या विपरीत आहे. काही दिवसांपूर्वी शेतकरी हितासाठी आम्ही कारखाना लवकर चालू केला असे आमदार रोहीत पवार म्हणत होते तर आज कारखान्यावर कारवाई झाल्या नंतर, त्याच्याच कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे हे आम्ही कारखाना सुरुच केला नाही फक्त कारखाना सुरु होण्यापूर्वी जे कारखाना क्लिनिंग होते ते आम्ही केले असे म्हणत असतील तर नेमके खरे कोण व आ. रोहित पवार खोटे बोलत होते का? असे प्रश्न डॉ गावडे यांनी उपस्थित करून एकप्रकारे आ. पवार यांना कोंडीतच पकडले आहे. मविआ सत्तेत असेपर्यत आम्ही शेतकरी हितासाठी कारखाना सुरु केला म्हणणारे आज कारखाना सुरुच केला नाही म्हणत जी कारवाई झाली ती राजकीय द्वेषाने केली असे म्हणत आहेत. यातून त्याची सत्तेची मग्रुरी आणि मुजोरी होती परंतु भाजप सेनेच्या सरकारने हा माज उतरविला असल्याचे म्हटले आहे.
कर्जत जामखेड मतदार संघाच्या विकासाचे मूल्यमापन करणारे सुभाष गुळवे नेमके आहेत कोण? तीन वर्षापूर्वी कोठे होते? बारामती पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्जतकडे पवार कुटुंबियांनी यापूर्वी कधीच स्वत: लक्ष का दिले नाही? आपल्या शेजारच्या मतदारसंघात पाण्यासाठी भटकंती करणारी माणसे आणि पाण्याअभावी तडफडणारी जनावरे हे चित्र प्रत्येक वर्षी साधारणतः डिसेंबर पासून सुरु व्हायचे त्यावेळी सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या पवार कुटुंबियांना कर्जत जामखेडकरांच्या व्यथा कधी का जाणवल्या नाहीत? असे जहाल प्रश्न उपस्थित करत डॉ गावडे यांनी पवार कुटुंबियांवर शरसंधान साधत युती सरकार मुळे कुकडीचे पाणी तालुक्याला मिळाल्याने उस क्षेत्र वाढल्यावर सुजलाम सुफलाम होऊ लागलेल्या कर्जत जामखेड यांना दिसले, स्वतःच्या खाजगी कारखानदारी साठी तालुक्यातील सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला गेला अशी टीका केली आहे. नियम बाह्य काम केल्याने कारखान्यावर कारवाई होत असताना बारामती अँग्रो साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे हे माजी मंत्री आमदार शिंदे यांच्यावर बेछूट आरोप करून शेतकरी हिताचे रडगाणे गात असून गुळवे यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे, त्यामुळे ते माजी मंत्री आमदार राम शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत आहेत, याशिवाय काही मानहानीकारक दावे करत आहेत. जे प्रश्न गुळवे उपस्थित करत आहेत त्याची उत्तरे त्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन शोधावीत. साल कऱ्याच्या मुलाच्या संपत्तीवर, उत्पन्न स्त्रोतावर प्रश्न उपस्थित करणारे स्वतःच्या मालकाच्या हेलिकॉप्टर घेण्याच्या महत्वाकांक्षेचे मात्र कौतुक करतात, हे योग्य आहे का? आ. रोहित पवार पण सार्वजनिक जीवनात आहेत मात्र त्यांच्या आज्या पणज्या पासून राजकरणात असल्याने त्यांच्या संपत्तीचा स्त्रोत विचारावा असे त्यांना वाटत नाही का? स्वतः इलेक्ट्रिक फिटरचे काम करणारे गुळवे एखाद्या मोठ्या उद्योग समूहात संचालक म्हणून मिरवतात हा मोठा यशस्वी टप्पा असला तरी यामागील रहस्य त्यांनी प्रथम जनतेला सांगावे.
आठवडी बाजार करणारे शरद पवार मुख्यमंत्री होतात त्यानंतरचा त्यांचा इतिहास जगाला सर्वश्रुत आहे. अजित पवार स्वत: सांगतात मी गाईच्या दूधाचा धंदा केला आणि गाई विकून जमिनी घेतल्या, त्यांच्या ही उत्पन्नाच्या स्त्रोताचा आणि त्यांनी उभारलेल्या उद्योगाचा धांडोळा आणि लेखाजोखा सुभाष गुळवे यांनी जनतेला दिला पाहिजे असा थेट हल्ला डॉ गावडे यांनी केला आहे. आमदार राम शिंदे हे महाराष्ट्राचे आमदार आहेत असे गुळवे म्हणतात, म्हणजेच अप्रत्यक्षपणे कर्जत जामखेड मध्ये त्यांनी लक्ष घालू नये, आम्हाला मनमानी करू द्यावी असं सुभाष गुळवेना सुचवायचे आहे काय? नियम बाहय काहीच काम केले नाही तर गुळवे इतके अस्वस्थ का झाले आहेत? स्वर्गीय श्री गोपीनाथ मुंढे यांच्या नंतर पवार कुटुंबियांशी थेटपणे राजकीय लढा करणारे त्यांचेच शिष्य आमदार राम शिंदे हे आहेत. राजकारणात राजकीय आरोप प्रत्यारोप नेहमीचेच असतात पण आमदार राम शिंदे यांनी पवार कुटुंबियाच्या संस्थानावरच हल्ला चढवल्याने आणि सरकारने ही थेट गुन्हा दाखल केल्याने हे त्याच्या जास्तच जिव्हारी लागलेले दिसते. आम्ही सरंजामदार, आम्ही म्हणू तो कायदा, महाराष्ट्र म्हणजे आम्हाला आंदण दिलेला आहे? अशा गोड गैर समजातून विविध संस्था मध्ये या कुटुंबियांनी आक्रमण करून त्या संस्था गिळंकृत केल्या आहेत आणि फायद्यासाठी मनमानी करत आहेत अशावेळी अशी चपराक त्यांच्या जिव्हारी लागणे साहजिक आहे त्यामुळे ते व्यक्तिगत श्री राम शिंदे यांच्यावर गरळ ओकत आहेत . श्री सुभाष गुळवे हे कर्जत जामखेड मतदार संघातील नाहीत पण आपल्या धन्यासाठी बेताल बडबडत आहेत. गुळवे यांनी आमदार राम शिंदे यांच्यावर आरोप करताना भाषेचा तोल सांभाळावा अन्यथा त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर मिळेल . कारखान्यावर गुन्हे का दाखल आहेत आणि हे गुन्हे का केले आहेत याचे उत्तर जनतेला द्या . शेतकरी हिताच्या तुमच्या पुतणा मावशीच्या प्रेमाच्या कळवळ्या ला जनता भुलणार नाही, असे शेवटी या प्रसिध्दी पत्रकात म्हतले आहे.
आ. रोहित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय सुभाष गुळवे यांच्या वर प्रथमच भाजपाच्यावतीने जाहीर वक्तव्य करताना आ. रोहित पवार यांचेसह शरद पवार, अजित पवार यांच्या उत्पन्न व कारभारावर गावडे यांनी टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, गुळवे यांचा व्हिडिओ मुळे भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल व त्याच अनुषंगाने भाजपच्या या पहिल्याच उत्तराने पुन्हा अनेक प्रश्न उभे राहिले असून, ही राजकीय धळवड कोणकोणते रंग उधळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.