बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा परिसरालाही पाऊस व गारांचा जबर फटका बसला. या नुकसानीची आज, २० मार्चरोजी राज्याचे माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी पाहणी केली. शासनाने नुकसानीची जाग्यावरच मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना केली.
१८ मार्च रोजी जिल्ह्यात विविध भागासह देऊळगाव साकरशा परिसरातही अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामध्ये रब्बीसह आंबा, कांदा, लिंबू, टरबूज व इतर पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’मध्ये वृत्त प्रसारित होताच याची प्रशासनाने दखल घेतली. ८ मार्चपासून तलाठी तुळशीदास काटे पाहणी करत असून, हमिदबेग मिर्झा हे त्यांना सहकार्य करीत आहेत.
आज २० मार्च रोजी राज्याचे माजीमंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी पीक नुकसानीची पाहणी केली. या परिसरातील कांदा, टरबूज व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना जागेवरच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सावजी यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना केली. यावेळी सरपंच संदीप अल्हाट, रणजीत देशमुख, शे.अबरार, छगन गायकवाड, पत्रकार गणेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.