– अमरावती, यवतमाळ, गोंदिया, पुणे, नाशिकमध्ये संप सुरूच राहणार!
– जुनी पेन्शन योजना लागू केल्याचा अध्यादेश काढा, तरच संप मागे घेणार – कर्मचारी संघटना
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे समन्वयक विश्वास काटकर यांनी राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केल्याबाबत कोणताही अध्यादेश (जीआर) न काढताही संप मागे घेण्याची केलेली घोषणा राज्यातील बेमुदत संपात सहभागी झालेल्या राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांना अजिबात पटली नसून, सर्व कर्मचार्यांनी ‘ओपीएस’ लागू झाल्याचा ‘जीआर’ निघत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विश्वास काटकर यांनी विश्वासघात केल्याचा ठपका, ठेवत अमरावती, यवतमाळ, गोंदिया, पुणे, नाशिक जिल्ह्यातील कर्मचार्यांनी संप सुरूच राहणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक पार पडल्यानंतर मध्यवर्ती कर्मचारी समितीचे समन्वयक विश्वास काटकर यांनी कर्मचार्यांचा संप मागे घेतला असल्याची घोषणा केली. उद्यापासून सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील, अशी घोषणाही काटकर यांनी केली. काटकर यांच्या या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त करत, आमच्याबरोबर विश्वासघात झाला. आमचा संप सुरूच राहणार अशी भूमिका आक्रमक कर्मचार्यांनी घेतली आहे. सोशल मीडियावर तर काटकर यांना किती ‘खोके’ मिळाले? अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आठ दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात जुन्या पेन्शनसाठी काम बंद आंदोलन सुरू असताना, आज कर्मचार्यांची मध्यवर्ती संघटना व राज्याचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाली. यानंतर हा संप मागे घेण्यात आला, असे सांगण्यात आले. मात्र, आम्हाला हा निर्णय मान्य नाही. आम्हाला पूर्णपणे जुनी पेन्शन पाहिजे. आम्हाला विश्वासात न घेता हा संप मागे का घेतला? अशा तीव्र भावना कर्मचार्यांनी व्यक्त केल्या.
मध्यवर्ती समितीने संप मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर कर्मचारी आक्रमक झाले आहेत. हा विश्वासघात असून संप सुरुच राहणार, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे उद्या किती कर्मचारी कामावर रुजू होणार आणि किती कर्मचारी संप चालू ठेवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती जिल्ह्यात संपामध्ये फुटीची ठिणगी पडली आहे. जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने हा संप सुरुच राहील, अशी भूमिका घेण्यात आलेली आहे. या शिवाय, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, पुणे, नाशिक जिल्ह्यातील कर्मचार्यांनीदेखील संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ओपीएस लागू झाल्याचा जीआर निघत नाही, तोपर्यंत संपातून माघार नाही, असे कर्मचारी विश्वास काटकर व राज्य सरकारला ठणकावत आहेत.
————————-