– आपत्ती निवारणासाठी साहित्य तर नाहीच; पण आपत्ती विभागदेखील गायब? मेहकर तहसीलदाराचे अक्षम्य दुर्लक्ष!
मेहकर (अनिल मंजुळकर) – मेहकर तालुक्यात येणार्या ग्राम अंत्री देशमुख येथे शेतातून छोट्या नावेमध्ये बसून नदी ओलाडताना ही नाव उलटून एका ४५ वर्षीय महिलेचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला, तर सहा महिला बचावल्याची घटना नुकतीच घडली. नदीत बुडालेल्या महिलेचा मृतदेह काल, १९ मार्चच्या सकाळी गावातील तरुणांनी शोधून बाहेर काढला.
मेहकरपासून जवळच असलेल्या ग्राम अंत्री देशमुख या गावातील काही शेती ही उकळी शेतशिवारात आहे. अश्यातच पैनगंगा नदी ओलांडून उकळी शेतशिवारात जावे लागते. त्यासाठी २२ वर्षांपासून छोट्या नावेचा वापर सुरु आहे. ही नाव दोन्हीकडील किनार्यावरील झाडाला दोरी बांधलेली असून, जवळपास १०० फूट अंतर हा नावेत बसून दोरी ओढून नाव या किनार्यावरून त्या किनार्यावर आणली जाते. अश्यात १८ मार्चरोजीसुद्धा शेतातून काम करून परत येणार्या सात महिला ज्यामध्ये सरुबाई रामभाऊ राऊत, वय ४५ (मृतक), कोकनबाई बाळासाहेब जाधव वय ६५, सरला मोहन राऊत वय ३५, छाया सुरेश माकोडे वय ५९, सागरबाई ज्ञानेर्श्वर आखाडे वय ३५, मंदाबाई भवना देशमुख वय ३५, लक्ष्मीबाई प्रदीप सुरुशे वय ३३ या महिला नावेत बसल्या आणि नेहमीप्रमाणे दोरी ओढत असतांना मधात जावून नाव कलांडली. ज्यात बुडणार्या महिलांना कोकणबाई बाळासाहेब जाधव वय ६५ वर्षे या वृद्ध महिलेने जीवाची बाजी लावून तीन महिलांना किनार्यावर पोचवले तर जीवन राऊत या १६ वर्षीय युवकांने ३ महिलांना किनार्यावर पोचवले. अश्यात सौं.सरूबाई रामभाऊ राऊत वय ४५ वर्षे ही महिला कोठेच दिसली नाही. तिचा शोध घेण्यासाठी गावातील तरुणांनी नदी पिंजून काढली. मात्र महिला मिळाली नाही. अश्यात १९ मार्चच्या सकाळी काही तरुणांनी शोध घेतला ज्यात नदीमध्ये गाळात फसलेला सरूबाईचे प्रेत नावेच्या खाली दिसून आले.
मृतक सरूबाईचा शोध घेण्यासाठी, ज्ञानेश्वर देशमुख सरपंच, अंकुशराव देशमुख उपसरपंच, संदीप देशमुख, शिवाजी देशमुख, गोपाल देशमुख, जीवन राऊत यांनी उडी घेऊन पाण्यातील ३ महिलांना वाचवले, जीवन देशमुख, दीपक देशमुख, गजानन जाधव, शिवाजी भीमराव देशमुख, गजानन देशमुख, कोकनबाई बाळासाहेब जाधव वय ६५ यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन ३ महिलांना वाचवले. केशव आखाडे, गजानन आखाडे, श्याम पुंड, गजू पुंड, मनोहर देशमुख, बाळू देशमुख, दत्ता सरोदे व अनेक गावकरी मंडळी शोधकार्यासाठी उपस्थित होते. सरपंच ज्ञानेश्वर देशमुख यांनी सांगितले की, आमच्याकडे आपत्ती निवारणाचे साहित्य असते तर अशी घटनाच घडली नसती ज्याने आमच्या गावाची अवस्था पाहता आपत्ती निवारणाचे साहित्य शासनाने आम्हाला द्यायला हवे.