– कर्मचार्यांच्या जुन्या पेन्शनसाठी साखरखेर्डा, इसरूळ, मंगरूळ, निमगाव वायाळ, अंढेरा, सावखेड तेजन, रुम्हणा, येळगाव, खंडाळा मकरध्वज, धोत्रा भनगोजी, हातणी, भरोसा, भोकर, माळशेंबा, साकेगाव, आमखेड, नायगाव, आंचरवाडी, मिसाळवाडीचे सरपंच-उपसरपंच मैदानात!
चिखली/ बुलढाणा (महेंद्र हिवाळे/बाळू वानखेडे) – राज्यातील १८ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, ही मागणी रास्त असून, या मागणीसाठी कर्मचार्यांच्या संपास आमचा पाठिंबा आहे. राज्य सरकारी कर्मचार्यांना तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील साखरखेर्डा, इसरूळ, मंगरूळ, निमगाव वायाळ, अंढेरा, रुम्हणा, येळगाव, सावखेड तेजन, खंडाळा मकरध्वज, धोत्रा भनगोजी, हातणी, भरोसा, भोकर, माळशेंबा, साकेगाव, आमखेड, नायगाव, आंचरवाडी या गावांसह मिसाळवाडीच्या सरपंच व उपसरपंचांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. तसेच, चिखली येथे सुरू असलेल्या कर्मचार्यांच्या संपास पाठिंबादेखील दिला आहे.
याबाबत १८ व १९ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्ड़ाच्या सरपंच सौ. सुमन सुनील जगताप, चिखली तालुक्यातील इसरूळचे सरपंच सतिष अण्णाराव भुतेकर, मंगरूळच्या सरपंच सौ. माधुरी ज्ञानेश्वर वरपे, देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा गावाचे सरपंच तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील सरपंच सौ. शीलाताई रामेश्वर चाटे, रुम्हणा गावाच्या सरपंच सौ. शशीकला भोसला, येळगावचे सरपंच दादा लवकर, सावखेड तेजनचे सरपंच किसन अचलखांब, भारत भगवान पानझाडे सरपंच खंडाळा मकरध्वज, गुलाबसिंग रामसिंग सोनारे सरपंच धोत्रा भनगोजी, सौ. कासाबाई रामेश्वर जाधव सरपंच हातणी, कु. शीतल वैजीनाथ शितोळे सरपंच भरोसा, गजानन फोलाने सरपंच भोकर, सौ. सुमन फकीरबा खोसरे सरपंच माळशेंबा, देविदास लोखंडे उपसरपंच साकेगाव, विद्या जगन्नाथ वाघ सरपंच आमखेड, गणेश जवंजाळ सरपंच नायगाव, सौ. कोकीळाताई समाधान परिहार सरपंच आंचरवाडी व चिखली तालुक्यातील मिसाळवाडी गावाचे सरपंच बाळू पाटील व उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद आहे, की २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या सरकारी व निम सरकारी कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, याच मागणीसाठी राज्यातील लाखो कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. जुनी पेन्शन योजना कर्मचार्यांना अत्यावश्यक असून, तो त्यांचा घटनादत्त हक्क असल्याने सदर पेन्शन योजनेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. तरी राज्य सरकारने तातडीने ही पेन्शन योजना लागू करावी व संपावर यशस्वी तोडगा काढावा, अशी मागणीही या गावांच्या सरपंचांनी केली आहे.
चिखली तालुक्यात जुनी पेन्शन आंदोलनाला सरपंचांचा उत्स्फूर्त पाठिंबा!
राज्य शासकीय, निम शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने राज्यभरात जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या काम बंद आंदोलनास चिखली तालुक्यातील गावोगावचे सरपंच उत्स्फूर्त पाठिंबा देत आहेत. आज २० मार्च रोजी पंचायत समिती चिखली येथे सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाच्या मंडपात प्रत्यक्ष येऊन सतिष आत्माराम भुतेकर सरपंच इसरूळ, सौ. माधुरी ज्ञानेश्वर वरपे सरपंच मंगरूळ, भारत भगवान पानझाडे सरपंच खंडाळा मकरध्वज, गुलाबसिंग रामसिंग सोनारे सरपंच धोत्रा भनगोजी, सौ. कासाबाई रामेश्वर जाधव सरपंच हातणी, कु. शीतल वैजीनाथ शितोळे सरपंच भरोसा, गजानन फोलाने सरपंच भोकर, सौ. सुमन फकीरबा खोसरे सरपंच माळशेंबा, देविदास लोखंडे उपसरपंच साकेगाव, विद्या जगन्नाथ वाघ सरपंच आमखेड, गणेश जवंजाळ सरपंच नायगाव, सौ. कोकीळाताई समाधान परिहार सरपंच आंचरवाडी, यांच्यासह विनोद लक्ष्मण मिसाळ सरपंच व हनुमान मिसाळ उपसरपंच मिसाळवाडी यांनी आपले समर्थन दिले. तसेच याप्रसंगी शिवसेनेचे (ठाकरे) संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर आणि समर्थन दिलेल्या सर्व सरपंचांनी मार्गदर्शन करून हा संप लवकर मिटावा, यासाठी कर्मचार्यांच्या जुन्या पेन्शनसह इतर सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अशी आग्रही मागणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी शिंदे साहेब, संदीप गवळी तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी हे उपस्थित होते. त्याच बरोबर आजपासून तलाठी संघटनेनेसुद्धा संपात सक्रिय सहभाग घेतला असून, संघटनेचे सचिव अनिल जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांनी संपाच्या मागण्यांसाठी पाठिंबा दिला.
——————