बिबी (ऋषी दंदाले) – पीकविमा देण्यात विमा कंपनीकडून टाळाटाळ होत असून, पीकविमा कंपनीने तात्काळ शेतकर्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मेहकर तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
सोयाबीन पिकावरील नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे पीकविमे मंजूर करण्यात आलेले आहेत. सदर नुकसानीला कित्येक महिने उलटूनही संबंधित विम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग झालेली नाही. आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केल्यावर आम्हाला विमा कंपनी प्रतिनिधींकडून विम्यांची रक्कम दिनांक ०९ मार्चपर्यंत जमा करण्यात येईल, अशी माहिती पुरविली गेली. परंतु आज ही तारीख उलटून आठवडा उलटला असताना अर्ध्याअधिक शेतकरी वर्गाची सदर रक्कम जमा झालेली नाही. आता लग्नसराई तोंडावर आलेली आहे. तसेच शेतीसाठी शेतकरीवर्गाला पैशाची गरज आहे. ही बाब लक्षात घेता, शेतकरीवर्गाला नापिकीमुळे ऐन लग्नसराईमध्ये आर्थिक चणचण भासून शेतकरीवर्गाच्या आत्महत्येचे वाढू शकते. त्यामुळे फुल न फुलाची पाकळी म्हणून का होईना, शेतकरीवर्गाची हक्काची विमा रक्कम तत्काळ शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अन्यथा आता शेतकरीवर्गाच्या न्याय हक्कांसाठी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या पद्धतीने आंदोलन करु, असा इशारा निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेड च्यावतीने तहसीलदार मेहकर यांना देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील, तालुका अध्यक्ष नितिन वैराळ, तालुका सचिव जगदीश एखंडे, महेश देशमुख, संदीप कानोडजे, सुनिल वाघमारे, कपिल वैराळ, निशांत पाटील, कैलास तांगडे, गजानन पवार, धनंजय बुरकुल, विनोद वायाळ, गोपाल गरड, प्रशांत इंगळे, दत्ता डव्हळे, रवि तायडे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.