– दारूबंद न झाल्यास १६ मार्चपासून उपोषणास बसणार!
बिबी (ऋषी दंदाले) – बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भुमराळा येथे अवैध दारुविक्री जोरात चालू असूनसुद्धा संबंधित विभाग कानाडोळा करत असल्यामुळे भुमराळा येथील लोकनियुक्त सरपंच संतोष मोरे यांनी दारुबंद करा, नाहीतर बिबी पोलीस स्टेशन समोरच आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे पोलिस प्रशासनाला दिला आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, भुमराळा येथे अनेक दिवसांपासून अवैध दारु विक्री चालू असून, यामुळे भुमराळा येथील तरुणपिढी व महिलांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दारुमुळे गावात भांडणतंटे वाढले आहेत. अनेक महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. यापूर्वी दोन ते तीन तरुणांनी दारुमुळे आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहेत. दारूच्या व्यसनामुळे गावात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून दारूबंदी करणे हा एकच पर्याय शिल्लक असल्याचे सरपंच मोरे यांनी नमूद केले आहे.
यासाठी गावात मासिक सभा बोलावून ग्रामपंचायत भुमराळा यांनी दारुबंदीचा ठरावसुद्धा मंजूर करुन तो बिबी पोलीस स्टेशन दिला आहे. तरी बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी १५ मार्च पर्यंत भुमराळयातील अवैध दारु विक्री बंद करावी, नाहीतर १६ मार्चपासून बिबी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास सुरवात करणार असल्याचा इशारा सरपंच संतोष मोरे यांनी दिला आहे. त्यामुळे आता ठाणेदार सदानंद सोनकांबळे हे अवैध दारुविक्री करणार्यांवर काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.