UPDATE
– अपघातातील मृत्युमुखी पडलेल्यांची नावे –
१. प्रमिला राजू बोरूडे (वय ४५), रा. टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
२. भाग्यश्री किरण बोरूडे (वय २७, रा. टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
३. श्रद्धा सुरेश बर्वे (वय ३५, रा. टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
४. जान्वी सुरेश बर्वे (वय १२, रा. टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
५. किरण राजू बोरूडे (वय ३५, रा. टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
६. हौसाबाई भरत बर्वे ( वय ५०, रा. टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
– अपघातातील गंभीर जखमी –
१. सौ. नम्रता रवींद्र बर्वे (वय ३२)
२. रूद्र रवींद्र बर्वे (वय १३)
३. यश रवींद्र बर्वे (वय १०)
४. सौम्य रवींद्र बर्वे (वय ४ वर्ष)
५. ज्ञतीन सुरेश बर्वे (वय ४ वर्ष)
६. वैष्णवी सुनील गायकवाड (वय १९)
सर्व रा. टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या सर्व जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील सिटी केअर हॉस्पीटलला हलविण्यात आले आहे.
अपघातग्रस्त इर्टिगा गाडीचा क्रमांक एमएच २० – ८९६२ आहे. अपघातग्रस्त हे छत्रपती संभाजीनगरातील टीव्ही सेंटर येथील रहिवासी आहेत. बाेरूडे व बर्वे परिवारातील असून, ते त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी समृद्धी महामार्गावरून जात होते. तसेच, ही कार शिवसेना नगरसेवकाची असल्याची माहिती समोर येत आहे. अपघात एवढा भीषण होता की, समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवर वाहतूक काहीकाळ पोलिसांनी थांबविली होती.
समृद्धी महामार्ग विदर्भाची भाग्यरेषा, की मृत्यूरेषा?; आतापर्यंत 40 भीषण अपघात, अनेक ठार!
मेहकर (अनिल मंजुळकर) – छत्रपती संभाजी नगरहून शेगावला जात असलेल्या भरधाव इर्टिगा गाडीचा मेहकरजवळील शिवनी पिसा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. कार भरधाव असल्याने ती कठड्यावर धडकून पलटी झाली. आज सकाळी आठ वाजता ही दुर्देवी घटना घडली. मृतांमध्ये महिलांचा समावेश आहे. तातडीने बचावकार्य राबवित जखमींना मेहकर येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी अत्यवस्थ जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील सिटी केअर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी असून, अत्यवस्थ स्थितीत आहेत. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरशः चक्काचुर झाला होता. समृद्धी महामार्ग विदर्भाची भाग्यरेषा बनेल की नाही, हे अद्याप निश्चित नसले तरी, सद्या तरी तो मृत्यूची रेषा बनला आहे. उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 40 भीषण अपघात झाले असून, त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. मृतांमध्ये पाच महिला व चालकाचा समावेश आहे. दरम्यान, अपघातग्रस्तांना तातडीने मदत न मिळाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त इर्टिगा कार छत्रपती संभाजीनगरहून शेगावला जात होती. गाडीत एकूण 12 प्रवासी होते. मेहकरजवळ शिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर गाडीचा अपघात झाला. अपघातात पाच महिला व चालकाचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर अत्यवस्थ स्थितीत आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले असून, तेथे सिटी केअर रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. भरधाव असलेली इर्टिगा कार अचानक चालकाकडून अनियंत्रित झाली. त्यामुळे कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला. या अपघातात पाच महिला, चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पाऊण तास अपघातग्रस्तांना कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. त्यानंतर अधिकारी तिथे दाखल झाल्यावर त्यांनी गावकऱ्यांनाच दमदाटी केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, 701 किलोमीटर लांबीचा नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग गेल्या काही दिवसांपासून अपघातांमुळेच चर्चेत आहे. गेल्या वर्षी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी या महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. राज्याच्या 10 जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गावर आतापर्यंत 40 भीषण अपघात झाले आहेत, त्यात अनेकांचा बळी गेला असून, शेकडो जायबंदी झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादा ताशी 120 किलोमीटर असल्यामुळे गाड्यांवरील नियंत्रण सुटल्याने हे भीषण अपघात होत आहेत.
दरम्यान, मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवनी पिसा गावाजवळ झालेल्या अपघातातील मृत व जखमी हे छत्रपती संभाजीनगरमधील टीव्ही सेंटर येथील बाेरूडे व बर्वे परिवारातील आहेत. त्यांची नावे व पत्ता पाेलिसांना प्राप्त झालेला आहे. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले होते. भरधाव असलेली इर्टिगा गाडी चालकाकडून अनियंत्रित झाली व सरळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकात घुसली. त्यानंतर तीन ते चार पलट्या खावून ती दुसर्या लेनवर कोसळली. अनेकजण अत्यवस्थ असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या घटनेचा तपास मेहकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागरे हे करित आहेत.
दुर्देवी अपघाताची तीव्र भीषणता दर्शविणारी छायाचित्रे – (ही छायाचित्रे विचलीत करू शकतात.)
छत्रपती संभाजीनगर येथून बोरुडे आणि बर्वे परिवार शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरता जात होते, मात्र समृद्धी महामार्गावर शिवणी पीसा गावाजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचे वरचे छप्पर उडून यामधील प्रवासी अक्षरशः रस्त्यावर विखुरले गेले होते. या अपघाताची नंतरची ही दृश्य मनाला चटका लावून जाणारी आहेत.