कलावंताला जात किंवा पक्ष नसतो – विष्णु शिंदे; कलावंतांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार – आ.संजय गायकवाड
– जिल्ह्यातील लोककलावंतांचा मेळावा उत्साहात
बुलढाणा (संजय निकाळजे) – कलावंतांच्या अनेक मागण्या शासन दरबारी पडून आहेत. मुख्यत्वे करून त्यांचा मानधनाचा प्रश्न महत्त्वाचा असून, त्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. असे सांगून कलावंताला कोणतीही जात किंवा धर्म नसतो किंवा तो कोणत्या पक्षाचा नसतो कला हाच त्याचा धर्म, जात आणि पक्ष असतो, असे प्रतिपादन लोककला सांस्कृतिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष गीतकार संगीतकार विष्णू शिंदे यांनी केले. तर कलावंतांच्या मागण्या समस्या व अडचणी आपण निश्चितच शासनाला कळविणार असून, त्या सोडविण्याचादेखील प्रयत्न करू, असे आश्वासन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ.संजय गायकवाड यांनी दिले.
बुलढाणा जिल्ह्यातील लोककलावंतांचा मेळावा शनिवार, ११ मार्च रोजी गर्दे वाचनालय सहभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सकाळी ११.३० ते २ वाजेपर्यंत लोककलावंतांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यानंतर दुपारी सांस्कृतिक क्षेत्रात विशेष सहभागाबद्दल लोक कलावंतांचा सत्कार करण्यात आला. लोककलावंतांच्या समस्या, मागण्या व इतर प्रश्नासंबंधी आंदोलनाची दिशा ठरविणे व आतापर्यंत संघटनेमार्फत केलेल्या कामाचा आढावा याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोककलावंत सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष तथा गीतकार, संगीतकार विष्णू शिंदे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ विद्रोही गायक आनंद कीर्तने, शाहीर डी आर इंगळे शाहीर निवृत्ती धोंडगे, रामदादा मोहिते, शंकर महाराज येळगावकर, दीपक महाराज सावळे, एस.टी सोनवणे, दादासाहेब काटकर, डॉ. किशोर वाघ ,सुरेश साबळे , जिल्हाध्यक्ष शाहीर शिवाजी लहाने यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी एड. विजयकुमार कस्तुरे, भीम कीर्तनकार दत्ता हिवाळे, युवा शाहीर विक्रांत राजपूत, शाहीर समाधान इंगळे, ज्येष्ठ शाहीर उत्तम फुलकर, युवा वादक सुमित गवई , शाहीर देविदास वानखेडे, शाहीर निवृत्ती तायडे, गायक विजय वानखडे, ढोलक वादक विजय दांडगे ,बँजो वादक भारत हिवराळे, संदेश हिवाळे यांच्यासह जेष्ठ कलावंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रसंगी पुढे बोलताना विष्णु शिंदे यांनी कलावंतांच्या काही मागण्या आपण मंजूर करून घेतल्या असून उर्वरित राहिलेल्या मागण्या आमदार महोदयांनी शासन दरबारी मांडून कलावंतांना न्याय देण्याची मागणी केली.
आमदार संजय गायकवाड यांनी आमदार झाल्यापासून मतदारसंघात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडून कलावंतांच्या मागण्या आपण शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन सोडविण्याचा निश्चितच प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तर शहरांमध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांचा पुतळा देखील उभारण्यात येईल, त्यासाठी आपण जागा निश्चित करा तो देखील प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. अगोदरच हा प्रश्न उपस्थित केला असता तर शहरांमध्ये उभारण्यात येणार्या महापुरुषांच्या पुतळ्यासोबतच वामनदादांचासुद्धा पुतळा उभारण्याची कार्यवाही करता आली असती, असेही त्यांनी सांगितले. त्यावेळी विद्रोही गायक आनंद कीर्तने व साहित्यिक सुरेश साबळे यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला जिल्ह्यातील लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन शाहीर डी आर इंगळे यांनी केले तर अनिल हेलोडे यांनी आभार मानले.